बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
By सचिन लुंगसे | Published: May 28, 2024 04:27 PM2024-05-28T16:27:15+5:302024-05-28T16:28:20+5:30
६ डिसेंबर २०२३ रोजी एडीआयटीसाठी खोदकाम सुरू करण्यात आले. ३९४ मीटर लांब संपूर्ण सहा महिन्यांच्या अल्पावधीत खोदण्यात आले.
मुंबई : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीच्या इंटरमीडिएट बोगद्याचे (एडीआयटी) खोदकाम करण्यात आले आहे. यामुळे बीकेसी ते शिळफाटा दरम्यान २१ किलोमीटर लांबीच्या बोगद्याच्या बांधकामाला गती मिळणार आहे. २६ मीटर खोल झुकलेल्या एडीआयटीमुळे न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड (एनएटीएम) द्वारे ३.३ किमी बोगद्याचे बांधकाम सुलभ होईल. ज्यामुळे दोन्ही बाजूंनी १.६ मीटर बोगद्यासाठी एकाच वेळी प्रवेश मिळेल. बोगद्याच्या २१ किमी बांधकामापैकी १६ किमी टनेल बोरिंग मशिनद्वारे तर उर्वरित ५ किमी एनएटीएमद्वारे आहे.
६ डिसेंबर २०२३ रोजी एडीआयटीसाठी खोदकाम सुरू करण्यात आले. ३९४ मीटर लांब संपूर्ण सहा महिन्यांच्या अल्पावधीत खोदण्यात आले. तज्ज्ञांच्या देखरेखीखाली २७ हजार ५१५ किलो स्फोटकांचा वापर करून एकूण २१४ नियंत्रित स्फोट करण्यात आले. सुरक्षित उत्खननासाठी उच्च दर्जाच्या उपकरणांचा वापर करण्यात आला. बोगदा आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व वास्तूंचे सुरक्षित उत्खनन व्हावे, यासाठी अनेक मॉनिटरिंग उपकरणांचा वापर केला जात आहे.
बीकेसी, विक्रोळी येथे निर्माणाधीन तीन शाफ्टमुळे टीबीएमच्या माध्यमातून १६ किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करणे शक्य होणार आहे.
- मुंबई बुलेट ट्रेन स्थानक ते शिळफाटा या २१ किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम वेगाने सुरू आहे.
- बोगद्याचा ७ किमीचा भाग ठाणे खाडी येथे समुद्राखाली असेल.
- देशात अशा प्रकारचा हा पहिलाच बोगदा उभारण्यात येत आहे.
- २१ किमी लांबीचा हा बोगदा अप आणि डाऊन ट्रॅकसाठी असलेल्या दोन ट्रॅकला सामावून घेणारा सिंगल ट्यूब बोगदा असेल.
- हा बोगदा तयार करण्यासाठी १३.६ मीटर व्यासाच्या कटर हेड असलेल्या टनेल बोरिंग मशिनचा (टीबीएम) वापर करण्यात येणार आहे.
- मेट्रो प्रणालीमध्ये वापरल्या जाणाऱ्या शहरी बोगद्यांसाठी ६-८ मीटर व्यासाचे कटर हेड वापरले जातात, कारण हे बोगदे केवळ एका ट्रॅकला सामावून घेतात.