महारेराच्या ३४ तक्रारदारांना ४.७८ कोटींच्या भरपाईचे वाटप
By सचिन लुंगसे | Published: June 14, 2023 12:53 PM2023-06-14T12:53:45+5:302023-06-14T12:54:44+5:30
लिलावातून नुकसान भरपाई मिळण्याची राज्यातील पहिलीच घटना
मुंबई : पनवेल क्षेत्रातील मोरबी ग्रामपंचायतीत एनके गार्डनचे भूपेश बाबू यांच्या मालमत्तांचा 20 एप्रिलला यशस्वीपणे लिलाव झाला होता. या लिलावातून आलेली रक्कम या प्रकरणातील 34 तक्रारदारांना नुकतीच वाटण्यात आली. यात 31 लाख 57 हजार ही सर्वात जास्त नुकसान भरपाईची रक्कम असून 3 लाख 48 हजार सर्वात कमी रक्कम आहे. याशिवाय 34 पैकी 30 तक्रारदारांना तक्रारीचा खर्च म्हणून एकूण सहा लाख रुपये वाटण्यात आलेले आहेत. रायगड जिल्हाधिकारी , संबंधित उप जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्या सक्रिय सहकार्यामुळेच हे शक्य झालेले आहे.
महारेराच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हा लिलाव झाला. आधार मूल्य 3.72 कोटी रूपये असताना लिलावात 4.82 कोटी रूपयांची बोली लागली. ज्यामुळे या प्रकरणातील 34 तक्रारदारांना नुकसान भरपाईची मुद्दल रक्कम अदा करण्यात आली. लिलावातून पैसे वसूल करून तक्रारदारांना नुकसान भरपाई देण्याची, मिळण्याची ही पहिलीच घटना आहे. महारेराच्या सततच्या पाठपुराव्यामुळे येत्या काळात राज्यात आणखी काही ठिकाणी मालमत्ता जप्ती आणि पर्यायाने लिलाव जाहीर होण्याची शक्यता आहे.
महारेराने रायगड जिल्ह्यातील ३८ प्रकल्पांतील दिरंगाई आणि तत्सम बाबींसाठी 99 प्रकरणी 22.2 कोटींचे वारंटस जारी केलेले आहेत. यात पनवेल तहसील कार्यालय क्षेत्रातील एन.के.गार्डन चे भूपेशबाबू या विकासकाकडून 33 वॉरंटसपोटी 6.50 कोटी वसूल होणे अपेक्षित होते. त्यासाठी पनवेल तहसील कार्यालयाने या विकासकाच्या मौजे मोर्बे येथील 93/2/9, 93/3, 93/5, 93/6, 93/9 , 93/11 या सर्वे क्रमांकांच्या मालमत्ता जप्त करून हा लिलाव ठेवलेला होता.
या लिलावात वसूल झालेल्या रकमेतून वाटपाबाबतच्या कायदेशीर तरतुदीनुसार ही रक्कम स्थानिक महसूल यंत्रणेमार्फत या प्रकल्पातील तक्रारदारांना महारेराने मंजूर केलेल्या नुकसान भरपाईनुसार वाटली .