७२ तासात ४ कोवळे जीव गेले; विधानसभेत गदारोळ, महापालिका आरोग्य अधिकारी निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 05:39 AM2021-12-24T05:39:03+5:302021-12-24T05:39:35+5:30
ॲडमिट करताना आम्हाला विचारलं होतं का? आरोग्य समिती अध्यक्षांची बेफिकीरी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भांडूप येथील मुंबई महापालिकेच्या सावित्रीबाई जोतिबा फुले प्रसूतिगृहात गेल्या तीन दिवसात चार कोवळे जीव प्रशासनाच्या बेपर्वाईमुळे हकनाक गेले. आणखी एकाची स्थिती अत्यवस्थ आहे. पालिकेच्या रुग्णालयातील या भोंगळ कारभाराचे पडसाद आज विधानसभेतही उमटले. भाजपने या घटनेचा निषेध करत आंदोलन केले. अखेर, पालिकेने या प्रकरणी चौकशी समिती स्थापन केली, तर, आरोग्य अधिकाऱ्यास निलंबित करण्यात आल्याची माहिती विधानसभेत देण्यात आली. या एकूण प्रकारामुळे मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा उजेडात आला असून पालिका रुग्णालयांचेच आरोग्य धोक्यात आले आहे.
नेमके काय झाले?
भांडुप येथील मुंबई महापालिकेच्या सावित्रीबाई जोतिबा फुले प्रसूतिगृहातील नवजात शिशूंसाठी कार्यरत अतिदक्षता विभागात शॉर्टसर्किटमुळे जीवघेणा संसर्ग होऊन ‘सेप्टिक शॉक’मुळे चार लहान बालकांचा मृत्यू झाला आहे. प्रसूतिगृहातील अतिदक्षता विभाग हा इंडियन पेडिॲट्रिक नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड या खासगी वैद्यकीय संस्थमार्फत चालविण्यात येतो. १८ डिसेंबर रोजी शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे जीवघेणे इन्फेक्शन होऊन ‘सेप्टिक शॉक’मुळे अनुक्रमे २०, २१ आणि २२ डिसेंबर रोजी चार लहान बालकांचा मृत्यू झाला. तर एका बाळाची स्थिती अत्यवस्थ आहे.
देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत हल्लाबोल
- हे प्रकरण गुरुवारी विधानसभेत उपस्थित झाले. असे आणखी किती मृत्यू होऊ देणार आहात, असा सवाल करून विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाईची मागणी केली.
- फडणवीस यांनी या भीषण दुर्घटनेची माहिती सभागृहाला दिली. रुग्णालयातील वातानुकूलित व्यवस्थेत बिघाड झाला. इन्क्युबेटरमध्ये ठेवलेली बालके शॉर्टसर्किटमुळे दगावली. या घटनेसाठी जबाबदार आरोग्य अधिकाऱ्याला तसेच मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना तत्काळ निलंबित करा, अशी मागणी केली. किती मृत्यूंची तुम्ही वाट पाहणार आहात, काही लाज, शरम नाही का? आधी भंडारा, नाशिक, आता मुंबईत बालके दगावली. सर्वात श्रीमंत महापालिका आहे ना, मग फक्त भ्रष्टाचारच आहे का?, असा एकच हल्लाबोल केला.
ही दुर्दैवी घटना आहे, पण आधी चौकशी करून मगच दोषींवर कारवाई करावी लागेल. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यास निलंबित करण्याची मी घोषणा करत आहे. - एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री
ॲडमिट करताना आम्हाला विचारलं होतं का?- आरोग्य समिती अध्यक्षांची बेफिकीरी
सार्वजनिक आरोग्य समितीच्या अध्यक्षा राजूल पटेल प्रसूतिगृहाची पाहणी करण्यासाठी पोहोचल्या. तिथे ठिय्या मांडणाऱ्या बालकांच्या नातेवाइकांनी जाब विचारत दोषींवर कारवाईची मागणी केली. मात्र नवजात शिशू अतिदक्षता विभागासाठी डॉक्टर मिळत नाहीत. दाखल करताना आम्हाला विचारलं होतं का, असा उलटा सवाल विचारला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मृत्यूप्रकरणी चौकशी समिती; सात दिवसांत अहवाल
चार बालकांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पालिका प्रशासनाने समिती स्थापन केली आहे. सायन रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागाचे प्रमुख, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आणि बालरोग तज्ज्ञांचा समावेश आहे. या समितीकडून सात दिवसांमध्ये अहवाल मागविण्यात आला आहे.