४ कोटी २२ लाखांची फसवणूक
By admin | Published: April 27, 2017 12:16 AM2017-04-27T00:16:52+5:302017-04-27T00:16:52+5:30
म्हाडाचे अधिकारी असल्याने स्वस्तात घर मिळवून देतो, असे सांगात साकीनाका येथील अनेक रहिवाशांना करोडो रुपयांचा गंडा घातल्याची घटना
मुंबई : म्हाडाचे अधिकारी असल्याने स्वस्तात घर मिळवून देतो, असे सांगात साकीनाका येथील अनेक रहिवाशांना करोडो रुपयांचा गंडा घातल्याची घटना काही दिवसांपूर्वी साकीनाका येथे घडली. यामध्ये पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या होत्या, तर यातील आणखी तीन आरोपींना मंगळवारी पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींनी अशा प्रकारे अनेकांची फसवणूक केल्याचा पोलिसांना संशय आहे.
अब्दुल बारी खान यांची २०१३मध्ये निजाम शेख (३१) या आरोपीशी ओळख झाली होती. आपली म्हाडामध्ये चांगली ओळख असल्याने म्हाडाची घरे आपण स्वस्तात मिळवून देऊ, अशी बतावणी त्याने खानकडे केली होती. त्यानुसार, २०१३ साली खान यांनी या आरोपीला दोन लाख रुपये घरासाठी दिले. खान यांचा विश्वास वाढावा, यासाठी आरोपी म्हाडा कार्यालयात जाऊन त्यांना बनावट नावाने फोनदेखील करत होता. त्यामुळे खान यांचा विश्वास त्याच्यावर अधिक वाढला. त्यामुळे आपल्या दोन भावांनादेखील घर हवे असून, दीड कोटी किंमत असलेली घरे अवघ्या वीस लाखांच्या आसपास मिळू शकतील, असे आमिष त्याने दाखविले. त्यासाठी पन्नास लाख रुपये खान यांनी निजामला दिले. याचदरम्यान कुतुबुद्दिन मेहदपूरवाला (३१), नौशाद कमाल खान (२८)आणि अब्रार महम्मद युसूफ शेख (४८) हे तीन आरोपी खान यांच्या घरी म्हाडाचे अधिकारी असल्याचे भासवून वारंवार ये-जा करत होते. त्यानंतर, निजाम यांनी अब्दुल यांना म्हाडाचे एजंट लायसन्स मिळवून देण्याचे आमिष दाखवत आणखी आठ लाख रुपये उकळले. त्या बदल्यात त्यांना एक बनावट लायसन्सदेखील बनवून दिले. त्याच्या माध्यमातून ‘अधिकाधिक लोकांना घरे देऊ, पैसे आणा’ असे तिघांनी अब्दुलला सांगितले. अब्दुलने मित्रांसह नातेवाईकांकडून सुमारे चार कोटी २२ लाख रुपये जमा करून निजामकडे दिले. मात्र, अनेक महिने उलटूनही एकालाही घर न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. (प्रतिनिधी)