लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाकाळात सर्वाधिक निर्बंध लागू करण्यात आले ते विमान प्रवासावर. पण, या काळातही तब्बल ४ कोटी ९३ लाख प्रवाशांनी देशांतर्गत प्रवासासाठी विमान सेवेचा वापर केल्याचे समोर आले आहे.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया) दिलेल्या आकडेवारीनुसार, २५ मे २०२० पासून ८ मार्च २०२१ पर्यंत ४ कोटी ९३ लाख ३३ हजार ३३८ प्रवाशांनी देशांतर्गत विमान प्रवास केला. या काळात ४ लाख ६३ हजार २४१ विमानांनी सेवा दिली.
भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सर्वप्रथम विमान प्रवासावर निर्बंध लागू करण्यात आले. लॉकडाऊनचे नियम हळूहळू शिथिल केल्यानंतर मे महिन्यापासून विमानसेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली. सुरुवातीला प्रवाशांचा प्रतिसाद अत्यंत अल्प होता. जुलैपासून प्रवाशांची संख्या वाढत गेली.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत विमान प्रवाशांची संख्या वाढली असली, तरी कोरोनापूर्व काळाप्रमाणे पूर्वपदावर आली नसल्याचेही या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
-------------------
आकडेवारी...
कालावधी - २५ मे २०२० ते ८ मार्च २०२१
प्रवासी संख्या - ४ कोटी ९३ लाख ३३ हजार ३३८
विमान उड्डाणे - ४ लाख ६३ हजार २४१