फेरतपासणीतून तिजोरीत ४ कोटी, माहितीच्या अधिकारातून समोर आली माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 04:52 AM2017-12-28T04:52:34+5:302017-12-28T04:52:45+5:30
मुंबई : परीक्षांच्या निकालांना केलेल्या विलंबामुळे मुंबई विद्यापीठाची मानहानी झाली. परिणामी, विद्यार्थ्यांच्या भविष्यातील वाटचालीलासुद्धा याचा फटका बसला.
मुंबई : परीक्षांच्या निकालांना केलेल्या विलंबामुळे मुंबई विद्यापीठाची मानहानी झाली. परिणामी, विद्यार्थ्यांच्या भविष्यातील वाटचालीलासुद्धा याचा फटका बसला. ब-याचदा मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना फेरतपासणीचा पर्यायही निवडावा लागला. याच फेरतपासणीच्या शुल्कातून विद्यापीठाच्या तिजोरीत तब्बल ४ कोटी ८३ लाख रुपये जमा झाल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारातून समोर आली आहे.
दरवर्षी जून-जुलै महिन्यांत जाहीर होणारे विद्यापीठाचे निकाल यंदाच्या वर्षी नोव्हेंबर महिना उजाडला तरीही जाहीर झाले नव्हते. शिवाय, विद्यापीठाच्या निकालाच्या गोंधळात सर्वच शाखांतील विद्यार्थी हैराण झाले होते. हीच बाब लक्षात घेऊन माहिती अधिकार कार्यकर्ते विहार दुर्वे यांनी माहिती अधिकारांतर्गत अर्ज केला. त्यानुसार, उत्तरात २०१६-१७ वर्षांत पुनर्मूल्यांकनाचे ४ कोटी ८३ लाख ३०,४९० रुपये जमा झाल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे. तर २०१५-१६ साली पुनर्मूल्यांकनाचे ५ कोटी २८ लाख ७८,०४० रुपये एवढे शुल्क जमा झाले होते. महत्त्वाचे म्हणजे, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फेरतपासणीचे शुल्क कमी असूनही विद्यापीठाकडे कोट्यवधी रुपये जमा झाले आहेत. तसेच फोटोकॉपीचे २० लाख ९३, ८२५ रुपये शुल्क जमा झाले आहे.