मुंबई : महाप्रलयात मुंबईला मगरमिठी मारणाऱ्या मिठी नदीच्या विकासासाठी सातत्याने खर्च करण्यात येत असून, आता या नदीच्या विकासासाठी तब्बल चार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मिठी नदीचा प्रवाह वेगाने व्हावा, यासाठी हा निधी वापरण्यात येत असून, मुख्यत: स्वच्छतेच्या कामासाठी निधीचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.मुंबई शहरात, उपनगरांत एकूण चार नद्या आहेत. यात मिठी, ओशिवरा, पोयसर आणि दहिसर नद्यांचा समावेश होता. सातत्याने वाढत्या प्रदूषणामुळे नद्यांच्या खाड्या झाल्या असल्या, तरी त्यांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी ‘रिव्हर मार्च’ आयोजित करण्यात येत आहेत. हा उपक्रम लोकसहभागाने आयोजित करण्यात येत असला, तरी प्रशासनही मिठीसाठी सरसावले आहे. महापालिकेचा चार कोटींचा निधी महापालिका हद्दीतील नदीच्या ११ किलोमीटरच्या स्वच्छतेसाठी वापरण्यात येणार आहे. दरम्यान, प्रदूषण आणि नदीकिनारी वसाहत निर्मित सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविना थेट नदीत सोडल्यामुळे मिठीचे रूपांतर नाल्यात झाले आहे. एमएमआरडीए आणि मुंबई महापालिका यांच्या समन्वयाने मिठी नदीचे काम सुरू आहे. (प्रतिनिधी)चार कोटींचा निधी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून खर्च करण्यात येणार आहे. सुमारे १७.८ कि.मी. लांबीच्या मिठी प्रवाह महापालिका हद्दीतील कुर्ला ते पवई यादरम्यान ११ कि.मी. लांबीच्या प्रवाहासाठी महापालिका हा निधी खर्च करणार आहे.पावसाळ््यात पवई, तुळशी, विहार तलाव भरले की, या पाण्याला मिठीतून वाट मोकळी होते. २००५ साली आलेल्या महापुरामुळे मुंबईकरांना अतोनात हाल सोसावे लागले, त्यामुळे मिठी नदी स्वच्छ करण्यासह मिठी नदीच्या सुशोभिकरणासाठी थेट केंद्राकडून १ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी एमएमआरडीए आणि महापालिका यांना तीन टप्प्यांत देण्यात आला आहे. मात्र, कोट्यवधी रुपये खर्च करूनही मिठीच्या स्वच्छतेसाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.गतवर्षी ब्रिक्स देशांच्या झालेल्या बैठकीत सेंट पीटर्सबर्गच्या धर्तीवर मिठीचा विकास करण्याच्या दिशेने पावले टाकण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. पीटर्सबर्ग नव्हे, तर केवळ नदी स्वच्छ करावी, अशी मागणी सामान्य मुंबईकर करत आहेत.
मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी ४ कोटी
By admin | Published: March 14, 2017 4:26 AM