४ कोटींचे कोकेन जप्त
By admin | Published: March 27, 2016 01:30 AM2016-03-27T01:30:17+5:302016-03-27T01:30:17+5:30
पोस्टल सेवेद्वारे अमेरिकेतून नवी मुंबईत ४ कोटी रुपये किमतीच्या कोकेनची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि
मुंबई : पोस्टल सेवेद्वारे अमेरिकेतून नवी मुंबईत ४ कोटी रुपये किमतीच्या कोकेनची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि अमलीपदार्थविरोधी पथकाच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली आहे. विलीअम फ्रॅन्क असे अटक नायजेरीयनचे नाव असून, त्याच्याकडून तब्बल ६०० ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे.
अमेरिकेतून अमलीपदार्थाचे पार्सल पोस्टलद्वारे नवी मुंबईत येणार असल्याची माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला मिळाली. त्यानुसार अमलीपदार्थविरोधी पथकाच्या मदतीने त्यांनी मुंबईसह नवी मुंबईतील पोस्टल आॅफिसकडे याबाबत माहिती दिली. हे पार्सल नवी मुंबई येथील कोपरखैरणेमधील पोस्ट कार्यालयात पोहोचताच त्यांनी याबाबत तपास पथकाला माहिती दिली. त्यानुसार तेथे सापळा रचलेल्या तपास पथकाने हे पार्सल घेण्यासाठी आलेल्या नायजेरीयन विलीअम फ्रॅन्कच्या मुसक्या आवळल्या. आंतरराष्ट्रीय ड्रगमाफियांनी हे कोकेन पोस्टलद्वारे पाठविले. त्यात त्यांनी चुकीचा केवायसी क्रमांक दिला होता. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने पोस्टल विभागाला याबाबत सतर्क राहण्यास सांगितले आहे. संबंधित व्यक्तीच्या पार्सलच्या केवायसी क्रमांकाची पडताळणी केल्याशिवाय ते पाठवू अथवा स्वीकारू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)