मुंबई : मुंबईतील दादर परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. येथील छबीलदास शाळेमध्ये सिलेंडर स्फोट झाल्याची घटना घडली. शाळेत एकापाठोपाठ 4 सिलेंडर स्फोट झाले. या दुर्घटनेमध्ये 3 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दादरमधील छबीलदास शाळेत आज पहाटेच्या सुमारास एलपीजी सिलेंडरचे स्फोट झाले. पहाटे 5 वाजेच्या सुमारास एकूण 4 सिलेंडरचे स्फोट झाले. या स्फोटामुळे टेरेसचे लोखंडी पत्रे खाली पडलेले आहेत, त्यामुळे शाळेच्या आवारात उभ्या असलेल्या दोन कारचे नुकसान झालेले आहे. शाळेच्या इमारतीला ठिकठिकाणी तडे गेलेले आहेत. यामुळे शाळेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच, स्फोटामुळे दादर परिसर हादरून गेला.
या दुर्घटनेमध्ये 3 जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने सायन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस पोहोचले असून मदतकार्य सुरू आहे.
गॅस वापरताना काळजी घ्यावी...घरगुती गॅस वापरताना निष्काळजीपणा केल्याने दुर्घटनांना सामोरे जावे लागते. गॅसच्या चुकीच्या वापरामुळे किंवा लिकेजमुळेही आग लागू शकते. गॅस लिकेजचा वास आल्यास सर्व दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवा. इलेक्ट्रिकचे कोणतेही उपकरण चालू अथवा बंद करू नये. गॅस उपकरण घरच्या घरी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू नये. गॅसमधील कोणत्याही प्रकारच्या उपकरणाचा बिघाड झाल्यास गॅस वितरकाशी संपर्क साधावा.