गिरणी कामगारांच्या पात्रता निश्चितीस ४ दिवसीय विशेष शिबिर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 01:24 AM2018-10-09T01:24:11+5:302018-10-09T01:25:07+5:30
पनवेलमधील मौजे-कोन येथील एमएमआरडीएच्या घरांसाठी विजेते ठरलेल्या गिरणी कामगारांची अद्याप पात्रता निश्चिती झालेली नाही, त्या कामगारांसाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने एक संधी उपलब्ध करून दिली आहे.
मुंबई : पनवेलमधील मौजे-कोन येथील एमएमआरडीएच्या घरांसाठी विजेते ठरलेल्या गिरणी कामगारांची अद्याप पात्रता निश्चिती झालेली नाही, त्या कामगारांसाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाने एक संधी उपलब्ध करून दिली आहे. पात्रता निश्चिती न झालेल्या तसेच विकल्प अर्ज सादर न केलेल्या कामगारांसाठी मंडळाने १२ आॅक्टोबरपर्यंत ४ दिवसीय विशेष शिबिर आयोजित केले आहे. याअंतर्गत कामगारांची पात्रता निश्चिती करत त्यांच्याकडून अर्ज भरून घेतले जातील.
वांद्रेतील समाज मंदिर हॉलमध्ये दररोज सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळत शिबिर सुरू राहील. एमएमआरडीएच्या भाडेतत्त्वावरील ५० टक्के घरे गिरणी कामगारांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. यात १ लाख ४८ हजार गिरणी कामगारांचा समावेश होता.या राज्य सरकारच्या आदेशानुसार मौजे-कोन येथील २,४१७ घरांसाठी २ डिसेंबर २०१६ रोजी गिरणी कामगारांसाठी लॉटरी काढण्यात आली होती. ही लॉटरी जाहीर होऊन २ वर्षे होऊन गेली; मात्र अजूनही विजेत्या गिरणी कामगारांना मौजे-कोन येथील घरांचा ताबा अद्याप देण्यात आलेला नाही. गिरणी कामगारांना आपलं हक्काचं घर मिळूनही घराचा ताबा मिळत नसल्याचं प्रमुख कारण म्हणजे यातील विजेत्या गिरणी कामगारांची पात्रता निश्चितीच अद्याप झालेली नाही.
मुंबई मंडळाने काही महिन्यांपूर्वी पात्रता निश्चितीला सुरुवात केली असून काही विजेत्यांची पात्रता निश्चिती पूर्ण झाली आहे. पण अजूनही अनेक विजेत्यांची पात्रता निश्चिती होणे बाकी आहे. पात्रता निश्चिती मार्गी लागत नसल्याने आणि विकल्प अर्ज सादर न झाल्याने वितरण वेगाने होत नसल्याचे चित्र आहे. त्यासाठीच हे विशेष शिबिर आहे.
जाचक अटी वगळल्या
मधल्या काळात गिरणी कामगारांच्या घरासाठी म्हाडाकडून पात्रता निश्चिती सुरू करण्यात आली होती. मात्र अर्जातील त्रुटींमुळे ती बारगळली होती. आता मात्र म्हाडाने अर्जातील जाचक अटी दूर केल्यामुळे गिरणी कामगारांना आवश्यक ते कागदपत्र असले तरी पात्रता निश्चिती मध्ये सहभागी होता येणार आहे. त्यामुळे या विशेष शिबिरामुळे २ वर्ष रखडलेल्या गिरणी कामगारांना लवकारच आपल्या हक्काच्या घरात जाता येणार आहे.