उद्धव ठाकरेंच्या 'मातोश्री' बंगल्यात आढळला ४ फूटाचा किंग कोब्रा, पाहा Video
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 09:40 AM2023-08-07T09:40:24+5:302023-08-07T09:42:00+5:30
सर्पमित्रांनी या सापाला पकडून जंगलात सोडले आहे. या संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनवेळी उद्धव ठाकरे हजर होते.
मुंबई – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी विषारी जातीचा किंग कोब्रा साप आढळल्याने खळबळ माजली. रविवारी सायंकाळी ४ फूटाचा कोब्रा साप बंगल्यावरील कर्मचाऱ्यांना दिसला. त्यानंतर तात्काळ वन्यजीव संरक्षण आणि रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. त्यानंतर सर्पमित्रांनी आणि रेस्क्यू टीमने या सापाला पकडले.
मातोश्री बंगल्यात असणाऱ्या पाण्याच्या टाकीमागे हा साप लपला होता. या प्रकाराची माहिती रेस्क्यू टीमला कळवल्यानंतर ते बंगल्यात पोहचले. त्यानंतर त्यांनी या सापाला पकडले. सर्पमित्रांनी या सापाला पकडून जंगलात सोडले आहे. या संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनवेळी उद्धव ठाकरे हजर होते. त्यासोबत तेजस ठाकरेही सापाला पकडताना पाहत होते.
मातोश्री बंगल्यात साप शिरला ही बातमी ऐकून उद्धव ठाकरे घराबाहेर आले. त्यांनी या सापाला पाहिले. ज्यावेळी सापाला रेस्क्यू केले जात होते तेव्हा मातोश्रीवरील स्टाफ आणि उद्धव ठाकरे तिथेच होते. किंग कोब्रा हा विषारी जातीचा साप असून त्याला पाहताच अनेकांना घामटा फुटतो. हा किंग कोब्रा जवळपास ४ फूटाचा होता. या सापाच्या चाव्याने माणसाचा जीव जातो.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री बंगल्यात आढळला विषारी जातीचा कोब्रा साप #UddhavThackeraypic.twitter.com/LVJhe31NKx
— Lokmat (@lokmat) August 7, 2023
संजय राऊतांच्या घरीही घुसला होता साप
अलीकडेच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या घरी साप शिरल्याची घटना घडली होती. खासदार संजय राऊत यांच्या भांडूपमधील घरात अचानक साप निघाल्याने सर्वांचीच धावपळ झाली. राऊत हे नेहमीप्रमाणे पत्रकार परिषद घेत होते. त्याचवेळी, सकाळच्या सुमारास ही साप निघाल्याची घटना घडली होती. पत्रकार परिषद सुरू असतानाच अगदी त्यांच्या खुर्चीच्या जवळच एक साप दिसला. पांदीवड प्रकारचा हा बिनविषारी साप होता, पण साप निघाल्यामुळे लवकरच पत्रकार परिषद आटोपण्यात आली. त्यानंतर, सर्पमित्राला बोलावून हा साप पकडण्यात आला. सर्पमित्राने बॅगमध्ये घालून साप नेला. मात्र, या प्रकाराची पत्रकारांमध्ये आणि त्यानंतर माध्यमांत चांगलीच चर्चा रंगली होती.