‘एनसीबी’ची मुंबई विमानळावर कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अमली पदार्थ नियंत्रण कक्षाची (एनसीबी) मादक पदार्थांविरुद्ध मोहीम सुरूच आहे. त्यांनी शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर एका झिम्बाब्बेच्या नागरिकाला अटक करून ४ किलो हेराॅईन जप्त केले. केनिथ मुलोवा असे त्याचे नाव असून तो झिम्बाब्वे आर्मीतील माजी सैनिक असल्याचे ‘एनसीबी’च्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
विमानतळ परिसरातील हॉटेलमध्ये उतरलेल्या एका झिम्बाब्वे नागरिकाकडे मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यानुसार गेल्या दाेन दिवसांपासून अधिकारी परिसरात पाळत ठेवून होते. शुक्रवारी तो हॉटेलातून विमानतळाकडे निघाला असताना पथकाने त्याचा पाठलाग केला. प्रवेशद्वारावर त्याला पकडले, त्याच्या ट्रॉलीतील बॅगची झडती घेतली असता त्यामध्ये ४ किलो हेराॅईन मिळाले. चौकशीत तो निवृत्त जवान असल्याचे स्पष्ट झाले.
विमानतळ परिसरात कोविड-१९ च्या नियमांचे उल्लंघन करून ताे फेरफटका मारत होता. त्याला पकडण्यासाठी एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याचा गणवेश परिधान केला होता. केनिथ मुलोवाकडे त्याने ड्रग्ज कोठून आणले आणि तो कोठे वितरित करणार होता, याबद्दल अधिक चौकशी करण्यात येत आहे.
...................................