मुंबई - आशिया खंडातील सर्वात श्रीमंत मॅरेथॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईमॅरेथॉनला आज पहाटे उत्साहात सुरुवात झाली. मॅरेथॉनच्या एलिट गटामध्ये इथियोपिया आणि केनिया या आफ्रिकन देशातील धावपटूंमध्ये मुख्य स्पर्धा रंगली. मुंबई मॅरेथॉनच्या मुख्य स्पर्धेत अर्थात एलिट रनमध्ये यंदाही इथिओपिआच्या धावपटूंचं वर्चस्व पाहायला मिळालं. डेरारा हरीसा विजेता ठरला आहे. मात्र मॅरेथॉनदरम्यान एका 64 वर्षीय व्यक्तीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई मॅरेथॉनमध्ये देश-विदेशातील व्यावसायिक धावपटूंसोबत हजारो हौशी धावपटू तसेच मुंबईकर अबालवृद्ध सहभागी झाले होते. याच वेळी कार्डिएक अरेस्टने 64 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. गजानन माळजळकर असं या व्यक्तीचं नाव असून ते 4 किलोमीटर अंतर धावल्यानंतर खाली कोसळले. उपचारासाठी त्यांना तातडीने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कार्डिएक अरेस्टने त्यांचा मृत्यू झाला. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या आणखी सात जणांना धावताना हृदयविकाराचा झटका आला आहे. उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. राधा सिंग (38), सहाना आचार्य (42), समीर निरगवडे (43), हर्ष मेहता(54), हिमांशू ठक्कर (47), लोयर्ड (38), सागर पाटील (33) या सात जणांवर उपचार सुरू आहेत. धावण्याच्या वेळी सर्वांना हृदयविकाराचा झटका आला असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून या मॅरेथॉनला सुरुवात झाली. तर वरळी डेअरी येथून अर्धमॅरेथॉनला सुरुवात झाली. मुंबई मॅरेथॉनचे यंदाचे हे 17वे वर्ष असून, या प्रतिष्ठेच्या मॅरेथॉनमध्ये सुमारे 55, 322 धावपटूंनी सहभाग निश्चित केला. 9660 मुख्य मॅरेथॉन आणि 15 हजार 260 धावपटू अर्धमॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे, खुली 10 किमी रन (8032), ड्रीम रन (19707), वरिष्ठ नागरिक रन (1022), दिव्यांग (1596) व पोलीस कप (45 संघ) अशा इतर गटांमध्येही सहभागी झाले होते.
महत्त्वाच्या बातम्या
...तर बेळगावातील मराठी बांधवांना सुटकेचा निःश्वास सोडता येईल- संजय राऊत
कंत्राटी पद्धतीवर काम करणारे कर्मचारीसुद्धा पीएफ योजनेस पात्र- सर्वोच्च न्यायालय
लोकसंख्या नव्हे, तर बेरोजगारी देशाची खरी समस्या, ओवैसींचा भागवतांवर पलटवार
CAA लागू करण्यासाठी कोणतंही राज्य नकार देऊ शकत नाही- कपिल सिब्बल
साईबाबा जन्मस्थळाचा वाद : शिर्डी आजपासून बंद