लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : यंदाच्या वर्षी ५ मे रोजी झालेल्या नीट-यूजी परीक्षेचा सुधारित निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) गुरुवारी जाहीर केला. प्रश्नपत्रिकेतील १९व्या प्रश्नाच्या दोन उत्तरांऐवजी एका उत्तराबाबत सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयामुळे सुमारे ४.२० लाख विद्यार्थ्यांचे ५-५ गुण कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या रँकिंगमध्ये बदल झाला आहे. तसेच या सर्व विद्यार्थ्यांचे चार फेऱ्यांमध्ये कौन्सिलिंग होणार आहे.
नीट-यूजी परीक्षेद्वारे वैद्यकीय महाविद्यालयांत एमबीबीएस, बीडीएस आदी अभ्यासक्रम तसेच काही अंडरग्रॅज्युएट वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट-यूजी परीक्षा घेण्यात येते. त्याशिवाय मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसच्या प्रवेशासाठी नीट-यूजी परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे विद्यार्थी आर्म्ड फोर्सेस मेडिकल सर्व्हिस हॉस्पिटलच्या बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात.
कौन्सिलिंगची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. कमिटीकडून कौन्सिलिंगच्या चार फेऱ्या होणार आहेत. गैरप्रकारांत सामील विद्यार्थ्याला कौन्सिलिंगमध्ये सहभागी होता येणार नाही. तसेच त्या विद्यार्थ्याची उमेदवारी रद्द केली जाईल. विद्यार्थ्यांनी कौन्सिलिंगच्या पहिल्या व दुसऱ्या फेरीमध्ये निवडलेल्या प्राधान्यानुसार त्यांना जागा बदलण्याची परवानगी दिली जाईल.
कौन्सिलिंगची होऊ शकते अतिरिक्त फेरी
ज्या उमेदवारांना कौन्सिलिंगच्या पहिल्या फेरीत वैद्यकीय प्रवेशासाठी जागा मिळाली असेल ते नंतरच्या फेरीत सहभागी होऊ शकणार नाहीत. तिसऱ्या फेरीत किंवा चौथ्या व अंतिम फेरीत एखाद्या विद्यार्थ्याची उमेदवारी रद्द करण्यात आली तर रिक्त जागा सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनुसार अतिरिक्त फेरीद्वारे भरण्यात येतील.