मुंबई : अनंत चतुर्दशीला आठवडा उलटल्यानंतरही अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेले खड्डे बुजवलेले नाहीत. त्यामुळे पालिकेने अशा मंडळांचा शोध घेऊन त्यांना दंड ठोठावण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा नंबर लागला आहे. मंडपासाठी दोनशे खड्डे पाडल्याने या मंडळाला पालिकेने ४ लाख ८६ हजार रुपये दंड ठोठावला आहे; गेल्या वर्षी हा दंड साडेचार लाख रुपये होता.गणेशोत्सव काळात मंडप उभारण्यासाठी मंडळे महापालिकेकडे अर्ज करतात. गणेशोत्सवानंतर या मंडळांनी मंडपासाठी खणलेले खड्डे बुजवण्याची अट घालण्यात येत असते. त्यानंतरही त्या ठिकाणी खड्डे आढळल्यास संबंधित मंडळाला दंड ठोठावण्यात येतो. या वर्षी गणेश मंडळांनी न बुजवलेल्या खड्ड्यांचे मोजमाप सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर त्या-त्या मंडळांना नोटीस बजावून दंड भरण्यास सांगण्यात येणार आहे. या दंडाची पहिली नोटीस सर्वांत श्रीमंत व यंदा गणेशभक्तांनी सात कोटी रुपये देणगी दिलेल्या लालबाग गणेशोत्सव मंडळाला गेली आहे.लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी प्रचंड रांगा लागत असल्याने त्यासाठी व्यवस्था करण्याकरिता हे खड्डे खणण्यात आले होते. संपूर्ण २४ विभागांत पाहणी करून गणेशोत्सव मंडळांना नोटीस पाठविण्यास एक आठवड्याचा कालावधी लागणार आहे. गणेशोत्सव मंडळे हा दंड भरेपर्यंत वाट न बघता पालिकेच्या एफ दक्षिण विभागाने हे खड्डे बुजविण्यास सुरुवात केली आहे. खड्डे पडलेले सर्व रस्ते येत्या आठवड्यात पूर्ववत करण्यात येतील, अशी हमी रस्ते विभागाने दिली आहे.११६५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्याची परवानगी महापालिकेने दिली. एकूण २०८५ गणेशोत्सव मंडळांनी महापालिकेकडे मंडप उभारण्याची परवानगी मागितली होती. यापैकी २३९ अर्ज फेटाळण्यात आले.प्रत्येक खड्ड्यामागे गणेशोत्सव मंडळांना दोन हजार रुपये दंड करण्यात येतो.
लालबागचा राजा मंडळाला ४ लाख ८६ हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 6:52 AM