विवाहाच्या स्वप्नापायी गमावले ८२ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 06:04 AM2019-09-21T06:04:09+5:302019-09-21T06:04:18+5:30

मोठमोठी स्वप्न पाहणे सहजशक्य आणि फुकटची गोष्ट आहे, असे म्हटले जाते.

4 lakh lost in the dream of marriage | विवाहाच्या स्वप्नापायी गमावले ८२ लाख

विवाहाच्या स्वप्नापायी गमावले ८२ लाख

Next

मुंबई : मोठमोठी स्वप्न पाहणे सहजशक्य आणि फुकटची गोष्ट आहे, असे म्हटले जाते. मात्र, गिरगावच्या एका महिलेला अमेरिकेतील इंजिनीअरसोबत विवाह करण्याचे स्वप्न पाहणे भलतेच महाग पडले आहे. यापायी तिला ८२ लाखांचा फटका बसला आहे. गिरगाव परिसरात ३८ वर्षीय नेहा (नावात बदल) ८ वर्षीय मुलासोबत राहते. त्यांचा इंटेरीयर डेकोरेटरचा व्यवसाय आहे. विवाहाच्या दोन वर्षांनंतरच पती-पत्नीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, २०११ पासून त्या मुलासोबत राहतात. त्यांचे घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
फेब्रुवारी २०१८ मध्ये त्यांनी विवाह संकेतस्थळावर नोंदणी केली. त्याच दरम्यान विक्रम मोहन नावाच्या व्यक्तीने त्यांना प्रतिसाद दिला. तो इंजिनीअर असून अमेरिकेचा रहिवासी आहे. त्याने सध्या कामानिमित्त लंडनमध्ये असल्याचे प्रोफाईलमध्ये नमूद केले होते. त्यांना प्रोफाईल आवडल्याने एकमेकांना मोबाइल क्रमांक शेअर झाले. संवाद सुरू झाला. व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हिडीओ कॉल सुरू झाले.
वर्षभरापूर्वी पत्नीचे निधन झाले. दोन लहान मुले आहेत. त्यांना आईची गरज असल्याचे सांगून त्याने नेहाला लग्नाबाबत विचारणा केली. त्यांनीही होकार दिला. पुढे, एप्रिल २०१८ मध्ये तो मुलांसह मुंबईला येणार आहे. तेव्हा लग्न करू या, असे सांगून विश्वास संपादन केला. नेहानेदेखील सुखी संसाराची स्वप्ने रंगविण्यास सुरुवात केली. एप्रिल महिन्यात विक्रम आला नाही. रस्त्याच्या कामाचे कॉन्ट्रक्ट मिळाले असून,
येणे शक्य नसल्याचे सांगून भेट टाळली.
>असे उकळले पैसे...
संवाद वाढल्यानंतर काही दिवसांनी रस्त्याच्या कामासाठी १० लाखांची आवश्यकता असल्याचे सांगून, पैसे व्याजासहित देण्याचे आश्वासन दिले. तिने सुरुवातीला १० लाख त्याने सांगितलेल्या खात्यावर पाठवले.
नेहाच्या आईने त्यांचे गिरगावस्थित घर विकल्याने त्याचे तिला ९० लाख रुपये मिळाल्याचे तिने विक्रमला सांगितले. तेव्हापासून विक्रमचा संवाद वाढला. पुढे, आणखी पैशांची आवश्यकता असल्याचे सांगून त्याने ७ लाख उकळले. त्यानंतर, १५ लाख काढून घेतले.
जून २०१८ मध्ये त्याने मुंबईला येऊन लग्न करणार असल्याचे सांगितले. पुढे, जून २०१८ मध्ये मशिनरी बंद पडल्याचे सांगून तत्काळ ५० लाख रुपये पाठविण्यास सांगितले. विक्रमचे काम लवकर पूर्ण होऊन त्याने लग्न करावे म्हणून तिने ५० लाख रुपये त्याच्या खात्यात जमा केल्याचे नेहाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
>...अन् संपर्क तोडला
पुढे त्याच्याकडून पैशांची मागणी वाढल्याने तिने पैसे संपल्याचे सांगितले. त्यानंतर, विक्रम नॉट रिचेबल झाला. त्याने, साईटवरून त्याचे अकाउंटही काढून टाकल्याने नेहाला संशय आला. तिने अनेकदा त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्या हाती काहीही लागले नाही. या प्रकरणात व्ही. पी. रोड पोलिसांत नुकताच फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार अधिक तपास सुरू आहे.

Web Title: 4 lakh lost in the dream of marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न