खासगी उप महाव्यवस्थापकाला गंडा, अंधेरीतील घटना
खासगी उप महाव्यवस्थापकाला गंडा, अंधेरीतील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अंधेरीतील एका खासगी कंपनीच्या उप महाव्यवस्थापकाच्या खात्यातून अवघ्या चार मिनिटांत एक लाख दहा हजार रुपये गायब झाल्याची घटना रविवारी अंधेरीत घडली. बँकेची कुठलीही माहिती शेअर केली नसतानाही पैसे कसे गेले याबाबत अंधेरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
अंधेरी परिसरात राहणारे ४२ वर्षीय समीर खाडीलकर यांची यात फसवणूक झाली आहे. ते खासगी कंपनीत उप महाव्यस्थापक आहेत. १५ ऑगस्ट रोज़ी मोबाईलवर आलेल्या संदेशाने तेही चक्रावले. दुपारी २.२७ ते २.३० दरम्यान झालेल्या ११ व्यवहारात त्यांच्या खात्यातून एक लाख दहा हजार रुपये काढल्याचा त्यात संदेश होता. तत्काळ याबाबत बँकेत चौकशी केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी अंधेरी पोलिसांत तक्रार दिली.
खाड़ीलकर यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी कुणालाही डेबिट कार्ड तसेच बँकेची माहिती शेअर केली नाही. कुणाला ओटीपीही सांगितला नाही. तरीदेखील पैसे गेले कसे? याबाबत अंधेरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
....
यापूर्वीच्या घटना
७ ऑगस्ट : दादरमधील ६५ वर्षीय सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्याच्या खात्यातून ३० हजार रुपये गेल्याची घटना घडली. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनीही कुणालाही डेबिट कार्डची माहिती किंवा ओटीपी क्रमांक शेअर केला नसल्याचे पोलिसांना सांगितले.
....