Join us  

राज्यात स्वाईन फ्लूचे आणखी ४ बळी!

By admin | Published: February 18, 2015 1:22 AM

राज्यात स्वाइन फ्लूच्या बळींचे सुरू सत्र सुरूच असून, मंगळवारी आणखी चौघांचा मृत्यू झाला़ बळी गेलेल्यांमध्ये पुण्याचे ३, तर लातूरमधील गर्भवतीचा समावेश आहे़

पुणे/लातूर : राज्यात स्वाइन फ्लूच्या बळींचे सुरू सत्र सुरूच असून, मंगळवारी आणखी चौघांचा मृत्यू झाला़ बळी गेलेल्यांमध्ये पुण्याचे ३, तर लातूरमधील गर्भवतीचा समावेश आहे़ पुण्यात १२ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले आहे.बळी गेलेल्यांपैकी एक रुग्ण हा सोलापूरचा, तर अन्य दोघे पुणे आणि पिंपरीतील आहेत़ या दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. घशातील कफाच्या तपासणी अहवालात त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले होते. या दोघांनी उपचारास स्वत: उशीर केल्याची नोंद महापालिकेने आपल्या अहवालात केली आहे. पुण्यात दीड महिन्यात बळींची संख्या १७ वर गेली आहे. दरम्यान, पुण्यात लागण झालेले तब्बल ५० रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये दाखल आहेत. त्यापैकी १२ जण अत्यव्यस्थ असून, त्यांना व्हेंटिलेटर ठेवण्यात आले आहे. दिवसभरात ३९१ जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १७१ जणांना टॅमी फ्लू औषधे देण्यात आली आहेत आणि २३ जणांच्या घशातील कफाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात ३४वर्षीय तरुणाचा मंगळवारी मृत्यू झाला. त्याला स्वाइन फ्लू झाल्याचे शुक्रवारी वैद्यकीय अहवालात कळाले होते. दरम्यान, मंगळवारी आणखी ५ रुग्ण आढळले असून, १० रुग्णांना टॅमी फ्लू औषधे सुरू करण्यात आली आहेत. लातूरमध्ये शासकीय सर्वोपचार रुग्णालयात उपचार घेत असलेल्या २८वर्षीय गर्भवतीचा सोमवारी मृत्यू झाला़ लातुरातील हा ‘स्वाईन’चा सहावा बळी ठरला आहे़ (प्रतिनिधी)