२४ तासांत ४ बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2016 03:33 AM2016-02-06T03:33:47+5:302016-02-06T03:33:47+5:30

उपनगरातील मुलुंड, भांडुप आणि दिंडोशी परिसरात २४ तासांत ४ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेने गुरुवारी एकच खळबळ उडाली

4 rape in 24 hours | २४ तासांत ४ बलात्कार

२४ तासांत ४ बलात्कार

googlenewsNext

मुंबई : उपनगरातील मुलुंड, भांडुप आणि दिंडोशी परिसरात २४ तासांत ४ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेने गुरुवारी एकच खळबळ उडाली. या घटनांमुळे अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या चारही प्रकरणांमध्ये लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून चारही नराधमांना पोलिसांनी अटक केली आहे.
मुलुंड पूर्वेकडील पत्राचाळीत राहणारी १५वर्षीय रीना (नावात बदल), आई, लहान बहीण, सावत्र वडील आणि त्यांच्या ४ मुलांसोबत येथे राहते. दोन वर्षांपूर्वी आईने रीना आणि तिच्या लहान बहिणीला मालेगाव येथे शिक्षणासाठी पाठविले. शाळेला सुट्टी असल्याने महिनाभरापूर्वी रीना आपल्या लहान बहिणीसोबत घरी परतली. गुरुवारी सकाळच्या आई कामानिमित्त बाहेर गेली होती. भावंडेही शाळेत निघून गेल्यानंतर रीना तिच्या लहान बहिणीसोबत घरात एकटीच होती. याचा फायदा घेत दुपारच्या सुमारास घरी परतलेल्या नराधम सावत्र बापाने बहिणीसमोर तिच्यावर बलात्कार केला. आठवड्याभरात या नराधमाचा हा दुसरा प्रयत्न होता. याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास जिवे ठार मारण्याची धमकी तिला देण्यात आली होती. या भीतीने रीनाने कुणाकडे वाच्यता केली नाही. मात्र बहिणीला होणाऱ्या वेदनांनी घाबरुन गेलेल्या रीनाच्या बहिणीने याबाबत शेजारच्या महिलेला सांगितले.
स्थानिक समाजसेविकेच्या मदतीने रीनाकडे विचारणा केली असता, तिने सावत्र बापाच्या कृत्याला वाचा फोडली. रीनाच्या आईने सायंकाळच्या सुमारास नवघर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक माधव मोरे यांनी पॉस्को कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. रीनावर राजावाडी रुग्णालयात उपचार
सुरू असून, या प्रकरणी अधिक
तपास सुरू असल्याची माहिती मोरे यांनी दिली.
भांडुप गावदेवी परिसरात राहत असलेल्या ५वर्षीय चिमुरडीवर शेजारी राहणाऱ्या २५वर्षीय शिवाजी तिडलोटकर या विकृताने बलात्कार केला. दुपारी साडेतीनच्या सुमारास घराबाहेर एकट्या खेळणाऱ्या चिमुरडीला आवाज देत पोटमाळ्यावर हेडफोन घेऊन येण्यास सांगितले आणि त्याने चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिला घराबाहेर सोडले. सायंकाळी साडेसातच्या सुमारास चिमुरडीला त्रास होऊ लागल्याचे आईच्या निदर्शनास येताच तिने मुलीकडे विचारणा केली असता, तिने ही घटना आईला सांगितली. भांडुप पोलीस ठाण्यात रात्री उशिराने तिलोटकरविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
दिंडोशी पोलीस ठाण्यात ४वर्षीय चिमुरडीवर आणि एका १५वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची नोंद झाली. शेजारी राहत असलेल्या सूरज मंडल या तरुणाने रात्री साडेदहाच्या सुमारास गेम खेळण्याच्या बहाण्याने या चिमुरडीला घरी बोलावले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. बराच वेळ मुलगी घरी परतली नाही म्हणून तिचा शोध घेण्यात येत असतानाच ती मंडलच्या घरातून बाहेर पडताना दिसली. बलात्काराच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती. दिंडोशीतच १५वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अंकीत मिरगळला अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)पूर्व आणि पश्चिम उपनगरात घडलेल्या बलात्काराच्या घटनेने चिमुकल्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. गेल्या वर्षभरात ४४७ मुली या लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरल्या आहेत. त्यापैकी ४२३ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.

Web Title: 4 rape in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.