Join us

मुंबईत दिवसभरात ४ हजार १४ रुग्ण, ५९ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 4:06 AM

मुंबई : मुंबईत मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी दैनंदिन रुग्णांमध्ये घट दिसून आली आहे. मुंबईत सोमवारी ३ हजार ८७६ ...

मुंबई : मुंबईत मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी दैनंदिन रुग्णांमध्ये घट दिसून आली आहे. मुंबईत सोमवारी ३ हजार ८७६ रुग्णांची नोंद झाली होती, तर मंगळवारी ४ हजार १४ रुग्ण आणि ५९ मृत्यू झाले आहेत. रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे झालेल्यांची संख्या अधिक असल्याने मुंबईकरांसह पालिकेसाठी ही सकारात्मक बाब आहे. शहर उपनगरात दिवसभरात ८ हजार २४० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत ५ लाख ५५ हजार १०१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ६६ हजार ४५ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ८७ टक्के झाला असून, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ६८ दिवसांवर आला आहे. २० ते २८ एप्रिलपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.०१ टक्के असल्याची नोंद आहे. शहरात दिवसभरात ३० हजार ४२८ चाचण्या करण्यात आल्या असून, आतापर्यंत एकूण ५३ लाख २ हजार ४९० कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

सक्रिय रुग्णांमध्ये घट

२७ एप्रिल ६६,०४५

२६ एप्रिल ७०,३७३

२५ एप्रिल ७५,७४०

२४ एप्रिल ७८,७७५

२३ एप्रिल ८१,५३८

२२ एप्रिल ८३,९५३

२१ एप्रिल ८४,७४३

धारावीत रुग्णदुपटीचा दर ११८ दिवसांवर

जी उत्तर वॉर्डातील दादर , माहीम आणि धारावी परिसरातील रुग्णसंख्येवर पालिकेचे विशेष लक्ष असून, या परिसरातील रुग्णदुपटीचा वेग जास्त दिवसांवर गेला असल्याचे दिसून येत आहे. मागच्या वर्षी या वॉर्डातील धारावीने सर्वाधिक चिंतेत लोटले होते. येथील रुग्ण दुपटीचा वेग तब्बल ११८ दिवसांवर गेला असल्याची माहिती जी नॉर्थ वॉर्ड प्रशासनाकडून देण्यात आली. जी नॉर्थ वॉर्डातील २६ एप्रिलपर्यंत दररोज सरासरी २५६ रुग्ण आढळून येत होते, तर या वॉर्डात रुग्णदुपटीचा सरासरी कालावधी ९७ दिवसांवर गेला असून, आठवड्याने रुग्ण दुपटीची सरासरी दर ०.७९ टक्के एवढा असल्याचे माहिती सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली. तसेच एकट्या दादर परिसरात एप्रिल महिन्यात रोज सरासरी १०१ रुग्ण आढळून येत असून, रुग्ण दुपटीचा दरही १०१ दिवसांचा असल्याचे सांगण्यात आले. तसेच माहीम परिसरात रोज सरासरी ९९ रुग्ण आढळून येत असून, रुग्णदुपटीचा कालावधी ९० दिवसांवर गेला आहे, तर धारावी परिसरावर महिनाभर दररोज सरासरी ५४ रुग्ण आढळून येत असून, रुग्णदुपटीचा सरासरी दर ११८ दिवसांचा होता, तर आठवड्याने रुग्ण वाढीचा दर ०.६३ टक्के एवढा असल्याचे सांगण्यात आले.