Join us

मुंबईत ४ हजार ९६६ रुग्ण, तर ७८ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 4:07 AM

मुंबई : मुंबईत बुधवारी ४ हजार ९६६ रुग्णांचे निदान झाले असून ७८ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या ...

मुंबई : मुंबईत बुधवारी ४ हजार ९६६ रुग्णांचे निदान झाले असून ७८ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६ लाख ४० हजार ५०७ झाली असून मृतांचा आकडा १२ हजार ९९० आहे. शहर उपनगरात दिवसभरातील रुग्ण निदानाच्या तुलनेत पुन्हा एकदा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक असल्याने मुंबईकरांसह पालिका प्रशासनासाठी ही सकारात्मक बाब आहे. दिवसभरात ५ हजार ३००रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण ५ लाख ६० हजार ४०१ रुग्णांनी कोरोनाला हरविले आहे.

मुंबईत सध्या ६५ हजार ५८९ रुग्ण उपचाराधीन आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी दिवसभरात ३९ हजार १३५ चाचण्या करण्यात आल्या असून एकूण ५३ लाख ४१ हजार ६२५ चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ८७ टक्के असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ७४ दिवसांवर आहे. २१ ते २७ एप्रिलपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.९३ टक्के असल्याची नोंद आहे.

मुंबईत तीव्र संसर्गाच्या काळात १४ टक्के असलेला पॉझिटिव्हीटी दर कमी होऊन ११.९१ टक्क्यांवर आला आहे. मागील चोवीस तासांत रुग्णांच्या संपर्कातील २८ हजार १०५ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेतला आहे. सध्या झोपडपट्ट्या आणि चाळींच्या परिसरात १२० सक्रिय कंटेन्मेंट झोन्स आहेत, तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या १ हजार ११४ आहे.