४५ रुपयांच्या प्रवेशासाठी गमावले ६० हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 01:09 IST2019-08-06T01:09:07+5:302019-08-06T01:09:15+5:30
ऑनलाइन ठगांकडून फसवणूक

४५ रुपयांच्या प्रवेशासाठी गमावले ६० हजार
मुंबई : गुगलवरून गाडी सर्व्हिसिंग सेंटरचा मोबाइल क्रमांक मिळविणे बोरीवलीतील विद्यार्थ्याला भलतेच महागात पडले. ठगाने गाडी सर्व्हिसिंगच्या प्रवेशासाठी ४५ रुपयांचे आॅनलाइन पेमेंट करण्यास सांगितले. पण हे करत असताना या विद्यार्थ्याच्या खात्यातून ६० हजार रुपये काढले. या प्रकरणी बोरीवली पोलीस अधिक तपास करीत आहेत.
बोरीवलीतील रहिवासी असलेला फोरम जैन (२०) यांची यात फसवणूक झाली आहे. तो एका नामांकित विद्यालयात शिक्षण घेत आहे. २ आॅगस्ट रोजी दुपारी ४ च्या सुमारास तो कारच्या सर्व्हिसिंगसाठी गुगलवरून जवळच्या सर्व्हिस सेंटरचे मोबाइल क्रमांक शोधत होता. त्यातून मिळालेल्या क्रमांकावरून त्याने संपर्क साधला. तेव्हा संबंधिताने गाडी सर्व्हिसिंगसाठी प्रवेश फी म्हणून ४५ रुपयांचे आॅनलाइन पेमेंट करण्यास सांगितले. कॉल सुरू असतानाच अन्य क्रमांकावरून मिसकॉल आला. संबंधित कॉलधारकाने, मिसकॉल आलेल्या क्रमांकावर कॉल करण्यास सांगितले.
त्या क्रमांकावरून संपर्क साधताच आरोपीने त्यांना एक गुगल अर्ज पाठवून त्यात यूपीआय पिन भरण्यास सांगितला. त्यात, मोबाइलवर आलेला ओटीपी क्रमांकही नमूद करण्यास सांगितला. तरुणाने अर्ज भरताच त्याच्या खात्यातून ६० हजार रुपये काढण्यात आल्याचा संदेश मोबाइलवर आला. या घटनेमुळे जैनला धक्काच बसला. त्याने तत्काळ पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.
महिलेच्या खात्यावर डल्ला
जैन तक्रार देत असतानाच, दिशा धिरेन गाला (४५) यांनाही कार्ड ब्लॉक झाल्याची भीती घालून आॅनलाइन ठगांनी ४९ हजार ४९० रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली. त्यांना बँकेतून बोलत असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्याकडून मोबाइलवर आलेला ओटीपी क्रमांक घेत, ही फसवणूक केली. दोन्ही प्रकरणांची एकत्र तक्रार नोंद करीत बोरीवली पोलीस अधिक तपास करीत आहेत.