साडेतेरा हजार पदांच्या भरतीचा ४ वर्षे खोळंबा; १२ लाख जणांनी भरलेल्या २५ कोटी रुपयांचे काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 06:00 AM2023-01-09T06:00:56+5:302023-01-09T06:01:15+5:30
जिल्हा परिषद भरती तीनदा पुढे ढकलल्याने तरुणांमध्ये असंतोष
- दीपक भातुसे
मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदेमधील भरती मागील साडेतीन वर्षांहून अधिक काळ रखडली असून, तीन वेळा ही भरती पुढे ढकलल्यानंतर रद्द करण्यात आली आहे. तीन सरकारांच्या काळात ही भरती रखडल्याने भरती इच्छुक तरुणांमध्ये प्रचंड असंतोष आहे. आता राज्य सरकारने यातील केवळ आरोग्य विभागाच्या भरतीचे वेळापत्रक जाहीर केले असून, उर्वरित पदांच्या भरतीचे काय, ज्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करून अर्जाची रक्कम भरली आहे त्याचे काय, असा प्रश्न उमेदवार विचारत आहेत.
तीन सरकारच्या काळातही होऊ शकली नाही भरती देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २६ मार्च २०१९ रोजी जिल्हा परिषदेच्या १३,५२१ जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली. महाविकास आघाडी सरकारने १४ जून २०२१ रोजी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करून ते २८ जून २०२१ रोजी रद्द केले. २८ ऑगस्ट २०२१ रोजी पुन्हा वेळापत्रक जाहीर करून ते २९ सप्टेंबर २०२१ रोजी रद्द केले. १० मे २०२२ रोजी पुन्हा वेळापत्रक जाहीर केले. नंतर शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा २६ ऑगस्ट २०२२ रोजी वेळापत्रक जाहीर करून १९ सप्टेंबर रोजी रद्द केले.
निवडणूक आचारसंहिता, कोरोनाही कारणीभूत
२१ ऑक्टोबर २०२२ रोजी शिंदे-फडणवीस सरकारने ही संपूर्ण भरती प्रक्रियाच रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. आधी निवडणूक आचारसंहिता, त्यानंतर महापोर्टल रद्द झाल्याने आणि कोरोना महामारी अशा विविध कारणांमुळे ही भरती प्रक्रिया रखडली होती.
जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांचे वय दिवसेंदिवस वाढत असून, भरती होत नसल्याने तरुणांमध्ये प्रचंड नैराश्य आले आहे. रखडलेली ही भरती तत्काळ करण्यात यावी.
- महेश बडे, स्टुडंटस् राईटस् असोसिएशन