Join us

कोस्टल रोड प्रकल्पाचे ४० टक्के काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या मुंबई सागरी किनारा मार्ग (कोस्टल रोड) प्रकल्पाचे काम वेगाने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या मुंबई सागरी किनारा मार्ग (कोस्टल रोड) प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचे ४० टक्के काम पूर्ण झाले आहे, तर मलबार हिल येथे समुद्राखालून जाणाऱ्या देशातील पहिल्या महाबोगद्याचे एक किलोमीटरपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ९०० मीटरपर्यंतचे काम सुरू आहे.

प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी लिंकपर्यंतचा १०.५८ किलोमीटरचा कोस्टल रोड मुंबई महापालिकेच्या माध्यमातून बांधण्यात येत आहे. या मार्गात चार अधिक चार लेनसह भरणीवरील रस्ते, पूल, उन्नत रस्ते आणि बोगदे आहेत. हे बोगदे खोदण्यासाठी चीनमधून २,३०० टन वजनाचे महाकाय टनेल बोअरिंग मशीन गेल्या वर्षी मुंबईत आणण्यात आले. मलबार हिलच्या खालून हे बोगदे जाणार आहेत. या प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग असणाऱ्या महाबोगद्याचे खोदकाम ११ जानेवारी २०२१ पासून सुरू करण्यात आले. टनेल बोरिंग मशीन या संयंत्राद्वारे हे काम सुरू आहे. त्यानुसार जमिनीच्या खाली १० ते ७० मीटर हे बोगदे असणार आहेत. प्रत्येक बोगद्याची लांबी २.०७ किलोमीटर असेल. या प्रकल्पाचे काम नोव्हेंबर २०२३पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य पालिका प्रशासनाने ठेवले आहे. यासाठी दररोज तीन सत्रांमध्ये काम सुरू आहे.

* कोस्टल रोडमुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. तसेच वेळेची ७० टक्के आणि इंधनाची ३४ टक्के बचत होणार आहे. ध्वनी आणि वायू प्रदूषणाचे प्रमाणही कमी होईल, असा दावा पालिका प्रशासन करत आहे.

* या प्रकल्पांतर्गत देशात प्रथमच ‘एकल स्तंभ’ (मोनो पाईल टेक्नॉलाजी) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. याद्वारे कोस्टल रोडचा भाग असणाऱ्या पुलांखाली १७६ खांब उभारण्यात येणार आहेत.

* या प्रकल्पासाठी १२ हजार ७०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. तसेच भराव टाकलेल्या जमिनीवर १२५ एकरचे उद्यान बहरणार आहे. १,८५२ वाहने उभी करणे शक्य असलेले भूमिगत वाहनतळही तयार केले जाणार आहे.