मुंबई - हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यभर महानाट्य दाखवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. या अंतर्गत ३६ जिल्ह्यांमध्ये महानाट्याचे प्रयोग करण्यासाठी ४० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये तीन दिवस शिवरायांवरील महानाट्याचे प्रयोग दाखवण्याची योजना आखण्यात आली आहे. २ ते ६ जून २०२४ या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, त्यापूर्वी महानाट्यांचे प्रयोग दाखवण्यात येणार आहेत. यासाठी निवडलेल्या महानाट्याची माहिती सध्या तरी जाहिर केलेली नाही. शिवरायांचे विचार, राजनीती, रणनीती, कार्यकुशलता, कार्य आणि शिवचरित्राची महती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची तसेच शिवकालीन वारसा आजच्या पिढीसमोर सादर करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.
या निमित्ताने सर्वसामान्यांपासून तळागाळातील जनतेपर्यंत सर्व स्तरांतील प्रेक्षकांना भव्य-दिव्य रंगमंचावर खरेखुरे हत्ती-घोड्यांसह महानाट्याची अनुभूती घेण्याची संधी मिळणार आहे. या घोषणेनंतर राज्य सरकारने निवडलेल्या महानाट्याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षकांसोबतच रंगकर्मींनाही आहे.