मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेच्या काळात मुंबईतून ४० कोटी ८० लाखांच्या ड्रग्जसहित साडेदहा कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेल्या रोकड प्रकरणी आयकर विभाग अधिक तपास करीत आहे. तर, मुंबई पोलिसांनी १९ हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
निवडणूक काळात मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून मुंबई पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदानासाठीही मुंबई पोलीस दलातील ४० हजार ४०० पोलीस सुरक्षेसाठी तैनात असतील.त्यात, सीपीएमएफच्या १४, एसआरपीएफच्या १२ कंपन्या तसेच ६ हजार होमगार्ड्स आहेत.
याच दरम्यान आचारसंहितेच्या काळात अमलीपदार्थविरोधी कायद्याअंतर्गत ४० कोटी ८२ लाख किमतीचा ड्रग्जसाठा जप्त केला. मुंबईत दाखल ३५ प्रकरणांत १० कोटी ५१ लाख ८० हजार ३५२ रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. प्राप्तिकर विभाग याची पडताळणी करीत आहे. सुमारे साडेदहा लाख रुपये किमतीचा अवैध दारूसाठाही जप्त करण्यात आला आहे.
शहरातील अभिलेखावरील गुन्हेगारांसह गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या १९ हजारांहून अधिक जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. यापैकी २०४ जणांना शहरातून हद्दपार करण्यात आले. ६ जणांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई केली. विविध खटल्यांमध्ये अनुपस्थित राहिलेल्या ४,८३३ आरोपींविरोधात न्यायालयाने जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंटची नोटीस बजावली. ८ हजार गुन्हेगार, गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्यांकडून फौजदारी दंड संहितेतील विविध तरतुदींनुसार हमीपत्र घेण्यात आले. पाच हजारांहून अधिक जणांना नोटिसा पाठवून कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, शहरातून ३९१ अवैध शस्त्रे विविध कारवायांतून जप्त करण्यात आली आहेत.
मुंबईत ३२५ मतदान केंद्र्रे संवेदनशीलशहर, उपनगरांत १,४९२ मतदान केंद्रांमधील १० हजार ०७३ बुथवर २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मुंबईच्या शहर जिल्ह्यात दोन मतदारसंघ असून ५२७ मतदान केंद्रे, २ हजार ६०१ बुथ तर उपनगर जिल्ह्यात चार मतदारसंघ असून ९६५ मतदान केंद्रे, ७ हजार ४७२ बुथ आहेत. निवडणूक आयोगाच्या विविध निकषांमुळे ३२५ केंद्र्रे संवेदनशील जाहीर करण्यात आली आहेत. त्यापैकी ६० उपनगरातील तर उर्वरित शहरातील २६५ केंद्रे असल्याची माहिती पोलीस प्रवक्ते मंजुनाथ सिंगे यांनी दिली.