भाडे व त्यावरील व्याजापोटी १२९.९२ कोटी थकीत; म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील भाडेकरू, रहिवाशांसाठी अभय योजनेचा तिसरा टप्पा जाहीर
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : म्हाडाच्या अभय योजनेचा तिसरा टप्पा जाहीर करण्यात आला आहे. या टप्प्याअंतर्गत १ मे २०२१ ते ३१ जुलै २०२१ या कालावधीत संपूर्ण थकीत भाडे भरल्यास थकीत भाड्यावरील व्याजावर ४० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे.
भाडेकरूकडे मोठ्या प्रमाणात भाडे व त्यावरील व्याजापोटी १२९.९२ कोटी थकले आहेत. या योजनेअंतर्गत जे भाडेकरू/ रहिवासी संपूर्ण थकीत रक्कम भरतील त्यांनाच ही सवलत लागू राहील. दरम्यान, २१ हजार १४९ संक्रमण शिबिर गाळ्यांमधील भाडेकरुंसाठी दोन टप्प्यांमध्ये राबविलेल्या अभय योजनेला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
म्हाडाने नेमून दिलेल्या भाडेवसुली करणाऱ्यांकडे रितसर भाडे भरून पावती घ्यावी. मंडळाने या कामासाठी कोणत्याही खासगी व्यक्तीची नेमणूक केलेली नाही, असे आवाहन मंडळाने केले आहे. फेब्रुवारी -२०२१ व मार्च - २०२१ या दोन महिन्यांमध्ये दोन टप्प्यात योजना राबविण्यात आली. पहिल्या टप्प्यात ६० टक्क्यांपर्यंत, तर दुसऱ्या टप्प्यात ४० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात आली. मंडळातर्फे संक्रमण शिबिरात पंपमन, इलेक्ट्रिशियन, सुरक्षा रक्षक, उद् वाहन देखभाल दुरुस्ती, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, सफाई कामगार आदी सुविधा पुरविल्या जातात. या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मंडळातर्फे भाडे आकारणी केली जाते.
* दाेन टप्प्यात मिळून ५ कोटी ३१ लाख १८ हजार ३३३ थकीत भाडे जमा
पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात ५ कोटी ३१ लाख १८ हजार ३३३ थकीत भाडे जमा झाले. पहिल्या टप्प्यांतर्गत २८ फेब्रुवारीपर्यंत ३ कोटी ३३ लाख १०२ रुपये मंडळाकडे जमा झाले असून दुसऱ्या टप्प्यांतर्गत ३१ मार्चपर्यंत १ कोटी ९८ लाख १८ हजार २३१ रुपये मंडळाकडे जमा झाले. पहिल्या व दुसऱ्या टप्प्याचा १ हजार १९८ भाडेकरुंनी लाभ घेतला. अभय योजनेव्यतिरिक्त भाडेकरूंनी नियमित १ कोटी ५७ लाख ४० हजार भाडे भरले.
......................................