दहिसरमध्ये उभारली अयोध्येच्या राम मंदिराची 40 फुटी भव्य प्रतिकृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 06:44 PM2018-11-23T18:44:11+5:302018-11-23T18:44:16+5:30
- दहिसर पश्चिम येथील विठ्ठल मंदिरात अयोध्येच्या राम मंदिराची भव्य प्रतिकृती उभारली असून, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोलडोंगरी, विलेपार्ले (पू. ) येथे महाआरतीपूर्वी 5.30 वा. श्री राम मंदिर निर्मितीसाठी महायज्ञ करण्यात येणार आहे.
- मनोहर कुंभेजकर
मुंबई- दहिसर पश्चिम येथील विठ्ठल मंदिरात अयोध्येच्या राम मंदिराची भव्य प्रतिकृती उभारली असून, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोलडोंगरी, विलेपार्ले (पू. ) येथे महाआरतीपूर्वी 5.30 वा. श्री राम मंदिर निर्मितीसाठी महायज्ञ करण्यात येणार आहे. मुंबईत ठिकठिकाणी होणाऱ्या महाआरतीला मुंबईतील 227 शिवसेना शाखांमधून हजारो शिवसैनिक सहभागी होणार असून, महाआरतीद्वारे घंटानाद करून श्रीरामाचा जल्लोष करणार आहेत.
अयोध्येत राम मंदिर लवकर बांधावे मागणीसाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उद्या 24 व 25 नोव्हेंबरला दोन दिवस अयोध्येत जात आहे. २४ नोव्हेंबर सायंकाळी ५.०० वा. अयोध्येत शरयू नदी किनारी उद्धव ठाकरे हे महाआरती करणार असून, त्याच वेळी महाराष्ट्रासह देशभरातील सर्व मंदिरामध्ये महाआरती होऊन त्यांच्या राम मंदिर उभारणीच्या कार्यास पाठिंबा दिला जाणार आहे. मुंबईत ठिकठिकाणी किमान 3 ते 5 हजार शिवसैनिकांच्या उपस्थितीत महाआरत्या द्वारे श्रीरामाचा घंटानाद होणार आहे. यानिमित्त मुंबईत ठिकठिकाणी मोठे कटआउट, होर्डिंग, बाईक रँली, भव्य मिरवणुका, महायज्ञ आदींचे आयोजन करण्यात आले असून, तसेच राम मंदिराची प्रतिकृती आदींचे आयोजन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.
आमदार व विभागप्रमुख विलास पोतनीस यांच्या मार्गदर्शनाखाली दहिसर पश्चिम येथील विठ्ठल मंदिरात होणाऱ्या महाआरती निमित्त उपविभागप्रमुख भालचंद्र म्हात्रे व उपविभागप्रमुख विनायक सामंत आणि दहिसर विधानसभेतील शिवसैनिकांनी 40 फुटी अयोध्येच्या राम मंदिराची भव्य प्रतिकृती उभारली आहे. तर मागाठाणे विधानसभेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी दहिसर पूर्व अशोकवन येथील हनुमान मंदिर,आजी आजोबा उद्यान येथे होणाऱ्या महाआरती निमित्त मोठे कटआउट लावले आहे.
शिवसेना विभागक्रमांक 3 च्या वतीने आमदार व विभागप्रमुख सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोशी,जोगेश्वरी व गोरेगाव विधानसभेच्या वतीने गोरेगाव पूर्व आरे चेक नाका येथील सर्व्हिस रोडवरील पंचमुखी हनुमान मंदिरात होणाऱ्या महाआरतीला श्रीराम व हनुमानाचे मोठे कटआउट लावले असून या तिन्ही ठिकाणावरून हर हिंदुकी यही पुकार,पाहिले मंदिर फिर सरकार,प्रभू श्रीराम चंद्र की जय असा जयघोष करत रॅली,बाईक रॅली काढून येथे पोहचणार आहेत.येथील 23 शिवसेना शाखांमधून किमान 4 ते 5 हजार शिवसैनिक येथे महाआरतीत सामील होणार आहेत.
शिवसेना विभाग क्र ४ व ५ वांद्रे ते जोगेश्वरी यांच्या वतीने विभागप्रमुख व आमदार अॅड. अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली महाआरती उद्या सायंकाळी ६.३० मी छत्रपती शिवाजी महाराज चौक , कोलडोंगरी , विलेपार्ले (पु )येथे करण्यात येणार आहे. याच दिवशी 5.30 वा. श्री राम मंदिर निर्मितीसाठी महायज्ञ करण्यात येणार आहे. भारतीय कामगार सेनेचे चिटणीस जितेंद्र जानावळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त वांद्रे पूर्व कलनगर, पश्चिम दुर्तगती महामार्ग येथे भव्य 800 फुटी मोठे बॅनर लावले असून त्यांनी खास तयार केलेल्या 25000 स्टिकर्सचे रिक्षा, टॅक्सी आणि खासगी वाहनांना वाटप केले आहे. मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी होणाऱ्या महा आरतीत वारकरी, डबेवाले, भजन मंडळी, महिला मंडळ, सेवाभावी संस्था, सामाजिक मंडळे, देवस्थाने इत्यादी विविध घटक सहभागी होणार आहेत.