मुंबई : गेल्या काही महिन्यांमध्ये मुंबईत आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. पाच महिन्यांत ३,२४५ दुर्घटनांची मुंबईत नोंद झाली आहे. यात ६३ नागरिकांचा बळी गेला असून १४९ जण जखमी झाले आहेत. याची गंभीर दखल घेऊन इमारती, झोपडपट्ट्या, मॉल्स आणि आस्थापनांमधील आग प्रतिबंधक यंत्रणेची झाडाझडती तीव्र करण्यात आली आहे. यासाठी महापालिका अग्निशमन दलासाठी ४० जीप खरेदी करणार आहे.गेल्या आठवड्यात साकीनाका येथील फरसाण कारखान्याला लागलेल्या आगीत १२ कामगारांचा मृत्यू झाला. अशा दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेने सोसायट्या, व्यवसाय-आस्थापनांना आगप्रतिबंध योजना उभारण्याकरिता एक महिन्याची मुदत दिली आहे. आगप्रतिबंधक यंत्रणा कार्यान्वित नसलेल्या इमारतींचे वीज-पाणी पालिका तोडणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत लवकरच सर्व इमारतींची पाहणी केली जाणार आहे.अग्निशमन दलाचे अधिकारी व त्यांच्याबरोबर पालिका अधिकारी या पाहणी मोहिमेत सहभागी होणार आहेत. मात्र अग्निशमन दलाचा मर्यादित फौजफाटा आणि मुंबईतील इमारतींमध्ये मोठी तफावत आहे. त्यामुळे हे काम वेगाने होण्यासाठी तसेच अशा दुर्घटनांना आळा घालण्याकरिता अग्निशमन दलात जीपची संख्या वाढविण्यात येणार आहे.अग्निशमन दलात सध्या ३९ जीप आहेत. प्रत्येकी सहा लाख ११ हजार किमतीच्या अशा ४० जीपसाठी महापालिका अडीच कोटी रुपये मोजणार आहे. या जीपमधील वायरलेस डिव्हाईसमुळे आगीच्या घटनेची माहिती तत्काळ पोहोचून मदतकार्य लवकर सुरू होईल. टाटा कंपनीच्या या जीप असून यातील २८ जीपची आॅर्डर देण्यात आली आहे.महिना दुर्घटना मृत जखमीएप्रिल ४८१ ३ २७मे ४८६ २ ७५जून ६६७ ४ १७जुलै ९८४ ३९ ३४आॅगस्ट ६२७ १५ १४एकूण ३२४५ ६३ १४९
इमारतींच्या तपासणीसाठी अग्निशमन दलात ४० जीप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 2:28 AM