विद्यार्थ्यांनी फी भरली नाही म्हणून शाळा पालकांच्या मागे तगादा लावल्याच्या अनेक घटना आपण आजवर पाहिल्या आहेत. इतकंच काय तर फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्याला शाळेतून घरी पाठविण्याचेही प्रकार आपण पाहिले आहेत. पण कोरोना संकटात आज जिथं एकमेकांना एकमेकांच्या साथीची गरज असताना एका मुख्याध्यापिकेनं सर्वांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
कोरोनाच्या संकटात रोजगार नसल्यानं फी भरणं ज्या विद्यार्थ्यांना शक्य झालं नाही अशा विद्यार्थ्यांची फी भरण्यासाठी मुंबईतील एका इंग्रजी शाळेच्या मुख्याध्यापिकेनं स्वत: मेहनत घेऊन लोकांकडे मदतीचं आवाहन करुन तब्बल ४० लाख रुपये जमा केले आहेत.
वाखाणण्याजोगीबाब म्हणजे या ४० लाख रुपयांतून या मुख्याध्यापिकेनं तब्बल २०० विद्यार्थ्यांची शाळेची फी तर भरली आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच शिक्षकांचे पगार देखील दिले आहेत.
मुंबईतील पवई येथील पवई इंग्लंड शाळेच्या मुख्याध्यापिका शर्लिन उदयकुमार यांनी ही अभिमानास्पद कामगिरी केली आहे. शर्लिन यांचं सर्वस्तरातून कौतुक केलं जात आहे. लॉकडाऊनमुळे शाळेत शिक्षण घेणाऱ्या अनेक पालकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आणि आर्थिच चणचण निर्माण झाली. त्यात ऑनलाइन शिक्षण सुरू झाल्यानंतर अनेक विद्यार्थी पालकांची नोकरी गेल्यामुळे फी भरू शकत नाहीत, हे शर्लिन यांच्या लक्षात आलं. मग त्यांनी या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि शिक्षकांनाही त्यांचा मोबदला मिळावा यासाठी धडपड सुरू केली.
सोशल मीडियाचा वापर करुन मदतीचं आवाहन केलं. याशिवाय अनेक कंपन्यांशीही संपर्क साधला. सुरुवातीला त्यांना कुणाकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला नाही. पण त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले आणि त्यांच्या प्रयत्नांना हळूहळू यश आलं. स्थानिक दानशूर व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संथ्या यांच्याकडून आर्थिक मदत शाळेला मिळू लागली आणि बघताबघता ५ महिन्यात ४० लाख रुपये शर्लिन यांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या फी साठी जमवले. यामध्ये फी सोबत शिक्षकांचं मासिक वेतन सुद्धा देण्याचं काम त्यांनी केलं आहे.