Join us  

पाणीटंचाईवर ४० लाखांचा आधार

By admin | Published: October 25, 2015 1:09 AM

शहराला मुबलक पाणी असतानाही आजही महापालिकेला पाणीकपात करावी लागत आहे. त्यातही यंदा पावसाने पाठ फिरविल्याने कपातीचे संकट आणखी गडद होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

ठाणे : शहराला मुबलक पाणी असतानाही आजही महापालिकेला पाणीकपात करावी लागत आहे. त्यातही यंदा पावसाने पाठ फिरविल्याने कपातीचे संकट आणखी गडद होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्यामुळे यावर उपाय म्हणून ठाणे महापालिकेने शहरातील विहिरी आणि कूपनलिकांची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेतले आहे. त्याही पुढे जाऊन प्रशासनाने महापालिकेच्या इमारती, शाळा, उद्याने, कार्यालये, रुग्णालये, डोंगराळ भाग आदी भागांत नव्याने कूपनलिका खोदण्यासाठी ४० लाखांची तरतूद केली आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला शुक्रवारच्या स्थायी समितीने मंजुरी दिली. महापालिका हद्दीत आजच्या घडीला ९०७ कूपनलिका वापरात आहेत. तसेच ५५५ विहिरींपैकी २१२ विहिरी या वापरात नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे उर्वरित विहिरींतील पाण्याचा वापर हा इतर कामांसाठी केला जात आहे. शहराला आजघडीला सुमारे ४७० एमएलडी पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या ते मुबलक असतानादेखील ठाणेकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा २४ टक्के कमी पाऊस झाल्याने एमआयडीसीने आठवड्यातून दोन दिवस पाणीकपात करण्याचे निश्चित केले आहे. परंतु, कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून ती लांबणीवर टाकली आहे. परंतु, येत्या १ नोव्हेंबरनंतर केव्हाही ती लागू होणार आहे. ही शक्यता लक्षात घेऊन ठाणेकरांना नैसर्गिक स्रोतापासून पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार, शहरातील अस्तित्वात असलेल्या कूपनलिका आणि विहिरी दुरुस्त केल्या जाणार आहेत. ज्या विहिरींतील पाणी वापरायोग्य नाही, ते वापारयोग्य करण्यासाठीही महा पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.नैसर्गिक स्त्रोताचा वापर : महापालिका कार्यालये, दवाखाने, इमारती, शाळा, रुग्णालये, मुंब्रा, कौसा, काही ठिकाणचा डोंगराळ भाग येथे आजही काही प्रमाणात पाण्याची समस्या जाणवत आहे. परंतु, येथे पिण्याचे पाणी देऊन इतर वापरासाठी लागणारे पाणी हे नैसर्गिक स्रोतापासून उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने नव्याने कूपनलिका खोदण्याची मोहीम हाती घेतली आहे. येत्या काही दिवसांत हे काम सुरू केले जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.