वरळी स्फोटातील जखमींवर उपचारास ४० मिनिटं विलंब, डॉक्टर बडतर्फ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 10:20 PM2021-12-29T22:20:55+5:302021-12-29T22:21:13+5:30
प्राथमिक चौकशीतून उघड, नायर रुग्णालयातील डॉक्टर बडतर्फ, परिचारिका निलंबित
मुंबई - वरळी येथील सिलेंडर स्फोटात जखमी कुटुंबावर पालिकेच्या नायर रुग्णालयात उपचार करण्यास ४० मिनिटे विलंब केल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे. याबाबतचा प्राथमिक अहवाल बुधवारी स्थायी समितीपुढे सादर करण्यात आला. या प्रकरणात उपचारास विलंब करणाऱ्या डॉक्टरला बडतर्फ तर परिचारिकेला निलंबित करून खात्याअंतर्गत चौकशी करण्याचे आदेश पालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
वरळी बीडीडी चाळीतील घरात ३० नोव्हेंबर रोेजी सिलेंडरचा स्फोट होऊन एका कुटुंबातील चार जण जखमी झाले होते. या चार जणांना त्या दिवशी सकाळी ६.११ वाजता नायर रुग्णालयातील अपघात कक्षात आणले होते. मात्र, प्राथमिक वैद्यकिय उपचार तत्काळ सुरु करणे आवश्यक असताना ४० मिनिटांनी त्यांना उपचार देण्यात आले, असे प्राथमिक तपासणीतून समोर आले आहे. पालिकेने या विभागातील सीसीटीव्ही फुटेज बघून हा प्राथमिक अहवाल तयार केला आहे.
मात्र या विलंबामुळे जखमी चार महिन्याच्या मुलासह आनंद पुरी, विद्या पुरी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, विष्णू पुरी या पाच वर्षीय बालकावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वेळेत उपचार न मिळाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले होते. या घटनेवरून शिवसेना - भाजपमध्ये शाब्दिक चकमक उडाली होती.
यांच्यावर कारवाई..
या प्रकरणात सहाय्यक वैद्यकिय अधिकारी डॉ.शशांक झा यांनी बडतर्फ केले आहे. तर, परिचारिका प्रीती सुर्वे यांची विभागीय, त्रयस्थ समितीमार्फत चौकशी सुरु केली आहे. तसेच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. राज्याच्या आरोग्य संचनालयाचे सह संचालक डॉ.अजय चंदनवाले यांच्या अध्यक्षतेखाली त्रयस्थ समिती नियुक्त करण्यात आली आहे. त्याचा चौकशी अहवाल सादर झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या समितीने १३ व १४ डिसेंबर रोजी नायर रूग्णालय येथे आपली प्राथमिक चौकशीची सुनावणी पूर्ण केली आहे. त्याचा अहवाल अद्याप आलेला आहे. हा अहवाल पालिका प्रशासनाला प्राप्त झाल्यावर संबंधित दोषींवर कडक कारवाईबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
असा आहे त्या दिवसाचा घटनाक्रम...
सकाळी ६.११ वा. -जखमींना अपघात विभागात आणले.
६.१२- कर्तव्यावर उपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याला माहिती देण्यात आली.
६.१४- वैद्यकिय अधिकारी डॉ.शशांक झा रुग्णांना तपासण्यासाठी आले. विद्या पुरी यांना तपासून त्यांची कागदपत्रे बनविण्यात आली.
६.१६-आनंद पुरी यांना तपासून कागदपत्रे बनविण्याचे काम सुरु
-६.१८ -बालकांना पेनकिलर औषध पाजण्याची सुचना डॉक्टरांनी परिचारिका आणि विद्यार्थी परिचारिकेला केली.
-६.४२-शल्य चिकीत्सा विभागातील दोन डॉक्टर येऊन त्यांनी तपासणी करुन उपचार सुरु केले.