लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लॉकडाऊन व अनलॉक मार्च ते डिसेंबर या कालावधीत रेल्वेने आवश्यक वस्तू व मालवाहतूक करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. २३ मार्च २०२० ते १७ डिसेंबर या कालावधीत मध्य रेल्वेने ७.७१ लाख वॅगनच्या माध्यमातून ४०.८५ दशलक्ष टन मालवाहतुकीची यशस्वीपणे वाहतूक केली आहे.
मध्य रेल्वेने दररोज सरासरी २,८५५ वॅगनप्रमाणे ७.७१ लाख वॅगन्समध्ये विविध वस्तूंची वाहतूक केली आहे. कोळशाच्या २.९९ लाख एए, कंटेनरच्या २.३२ लाख वॅगन्स, सिमेंटच्या ५३,४५६ वॅगन्स, अन्नधान्याच्या ८,०६७ वॅगन्स, खतांच्या ३६,५४२ वॅगन्स, पेट्रोल, तेल आणि वंगणच्या ७२,२८४ वॅगन्स, लोह व पोलादच्या १९,७८६ वॅगन्स, साखरेच्या ४,१०७ वॅगन्स, कांद्याच्या ७,६१६ वॅगन्स, डि-ऑइल केकच्या ४,०५४ वॅगन आणि इतर संकीर्ण वस्तूंच्या ३३,८५५ वॅगन्स मालाची वाहतूक करण्यात आली.
मध्य रेल्वेने १.७६ लाख टन पार्सलचीही वाहतूक केली आहे, ज्यात औषधे आणि फार्मा उत्पादने, ई-कॉमर्स वस्तू, मेल आणि इतर हार्ड पार्सल, दूध इत्यादी आवश्यक वस्तूंचा समावेश आहे. लॉकडाऊनपासून चालत असलेल्या ७०३ वेळापत्रकानुसार धावणाऱ्या पार्सल गाड्यांमधून १.०४ लाख टन वस्तूंची वाहतूक झाली आहे. १ जूनपासून चालू असलेल्या विशेष गाड्यांच्या पार्सल व्हॅनमधून ६८,५३३ टन पार्सलची वाहतूक तसेच ३,४४९ टन दुधाची टँकर्समधून वाहतूक करण्यात आली.