'हे गद्दार आहेत अन् ४० लोक गद्दार म्हणूनच महाराष्ट्रात फिरणार'; आदित्य ठाकरेंचा पुन्हा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 11:30 PM2022-07-28T23:30:47+5:302022-07-28T23:33:17+5:30
माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर आज पुन्हा निशाणा साधला आहे.
मुंबई- माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर आज पुन्हा निशाणा साधला आहे. बंडखोरांनी प्रामाणिक माणसाच्या पाठीत खंजीर खुपसाला आहे. ज्या माणसाने यांना राजकीय ओळख दिली, त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसाल्यानं दुःख वाटत आहे, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांना आव्हान देखील दिलं आहे. राजीनामा देण्याची कोणाची हिम्मत नाही. हे गद्दार आहेत अन् ४० लोक गद्दार म्हणूनच महाराष्ट्रात फिरणार, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. तसेच कायद्याप्रमाणे शिवसेनेची बाजू मजबूत आहे. राक्षसी महत्वाकांशा घेऊन हे सरकार आलं आहे. त्यामुळे हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार, असा विश्वास देखील आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला आहे.
आदित्य ठाकरेंनी आज नवी मुंबईतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी नवी मुंबईत शिवसेना अधिक मजबूत करण्याबाबत तसेच संघटनात्मक कार्य अधिक वेगाने होण्याबाबत आदित्य ठाकरे यांनी चर्चा केली.
आज नवी मुंबईतील शिवसेनेच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी नवी मुंबईत शिवसेना अधिक मजबूत करण्याबाबत तसेच संघटनात्मक कार्य अधिक वेगाने होण्याबाबत चर्चा झाली. pic.twitter.com/yBl3vuN111
— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 28, 2022
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेऊन १ महिना होत आला तरी महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तारावरून कोंडी कायम आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी संध्याकाळी आपला नियोजित दिल्ली दौरा अचानक रद्द केला त्यामुळे नेमकं विस्तार का रखडला याची चर्चा सुरू झाली आहे. यावर देखील आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. दोन लोकांचं जम्बो कॅबिनेट आपल्या महाराष्ट्रात आहे, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे.
दरम्यान, सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री चर्चा करत आहेत. यातच कोणते जिल्हे ते घेतील कोणते जिल्हे आम्हाला मिळणार. त्यांचे किती मंत्री असतील, आमचे किती मंत्री मंत्री होणार. ही वाटाघाटी कंदाची झाली असावी. मात्र अंतिम निर्णय अद्याप झाला नाही. मला असं वाटत पुढील दोन दिवसात अंतिम निर्णय होईल आणि आगामी ३ ऑगस्टपूर्वी १०१ टक्के मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.