मुंबई - ‘पुलवामा’ हल्ल्याबाबत सरकारवर शंका व्यक्त केली म्हणून समाजवादी पार्टीचे नेते राम गोपाल यादव यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला गेला आहे. एकेकाळी मिसा, टाडा, पोटा, तडीपारीचा वापर राजकारण्यांवर होत असे. आता ‘देशद्रोहा’चे आरोप व गुन्हे यांनी त्यांची जागा घेतली. राफेल प्रकरणात काँग्रेसने भाजपच्या नेत्यांना देशद्रोही ठरवले, तर पुलवामा प्रकरणात सत्ताधारी हे काँग्रेस व इतरांना देशद्रोही ठरवत आहेत. देशद्रोही शब्दाचे महत्त्व आणि भीती त्यामुळे संपली. देशातील 40 ते 45 टक्के जनता अशाने देशद्रोही ठरेल. कारण हे लोक सतत कोणत्या ना कोणत्या सरकारविरुद्ध मतदान करीत असतात. देशप्रेमाला जितके महत्त्व तितकेच देशद्रोह शब्दाचे भय राहायला हवे. ते आज संपले आहे असं रोखठोक मतं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मांडले आहे.
देशभक्ती व देशसेवेची पातळी घसरली असून हे देशद्रोहापेक्षा गंभीर आहे. लोकसभा निवडणुकीत नेत्यांपेक्षा त्यांचे भक्तच इरेला पेटले आहेत. ‘देशद्रोह’ आणि ‘देशभक्ती’ या शब्दांची नवी व्याख्या या निवडणुकीत ठरत आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्याचसोबत देशात कुणाचीही एकाधिकारशाही राहू नये म्हणून सत्ताधाऱ्यांसमोर प्रबळ विरोधी पक्ष निर्माण व्हावा. विरोधी पक्षनेत्यांची मुस्कटदाबी सुरू होते तेव्हा संविधान व लोकशाहीची हत्या होते असंही राऊत यांनी सांगितलं.
संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक सदरात अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केलं. त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे -
लोकशाहीत व्यक्तिपूजा असू नये; पण पन्नास वर्षांपासून त्या व्यक्तिपूजेतच आपण धन्यता मानत आहोत. पुढारी लायक असेल तर त्याच्याबद्दल कौतुक, प्रेम, आदर या भावना बाळगायला हरकत नाही. तेवढय़ानेच त्या पुढाऱ्याचे आणि त्याच्या अनुयायांचे समाधान व्हावयास हवे. पण पुढाऱयांची देवाप्रमाणे पूजा करणे ही गोष्ट मला बिलकूल मान्य नाही. त्यामुळे त्या पुढाऱयाबरोबर त्याच्या भक्तांचेही अधःपतन होते.
लोकसभा निवडणूक नेते आणि मतदार लढत नसून सर्वच पक्षातले अंध भक्त लढत आहेत. एकमेकांविषयी इतका द्वेष, तिरस्कार, शत्रुत्व मी याआधी कोणत्याच निवडणुकीत पाहिले नव्हते. इंदिरा गांधी यांच्या विरोधात आणीबाणीनंतर विरोधक एकवटले. ती वैचारिक लढाई होती. इंदिरा गांधींबद्दल द्वेष नव्हता. आता ‘देशद्रोही’ हा एक सोपा आणि परवलीचा शब्द झाला आहे. ऊठसूट कोणीही कुणाविरुद्ध वापरत आहे. लोकसभा निवडणुकीतून पुलवामा हल्ला, राफेल हे मुद्दे बाजूला पडले व ‘देशद्रोह, चौकीदार’ या शब्दांवर निवडणुकीचा शिमगा सुरू आहे.
महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रमुख लोक रोज भाजपात प्रवेश करताना दिसतात. राष्ट्रवादीच्या, काँग्रेसच्या अनेक नेत्यांची जागा तुरुंगात असायला हवी होती, ते सर्व लोक सत्ताधारी पक्षात भरती होत आहेत. पुढेही होत राहतील. पण राजकारणात हे चालायचेच म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करीत असतो.
ज्याच्यावर देशद्रोहाचा आरोप आहे तो कन्हैयाकुमार बिहारातील बेगुसराय मतदारसंघातून लोकसभा लढत आहे. त्याने निवडणूक लढण्यासाठी लोकांकडे पैसा मागितला तेव्हा दहा मिनिटांत पाच लाख रुपये जमा झाले. हे चिंताजनक. दहशतवाद्यांना पैसे देणारे दहशतवाद्यांचे हस्तक. मग कन्हैयाकुमारच्या झोळीत पैसे टाकणारे कोण? कन्हैयाकुमारचा पराभव हा संविधानाचा विजय ठरेल. बेगुसरायमध्ये कन्हैयाकुमारच्या पराभवाचा विडा प्रकाश आंबेडकर यांनी उचलला तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ती मानवंदना ठरेल
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उर्मिला मातोंडकर यांनी राजकारण्यांना जमणार नाहीत इतक्या सफाईदारपणे मुलाखती दिल्या. त्यांचा राजकीय गृहपाठ पक्का करून त्या राजकारणात आल्या. असा गृहपाठ कितीजण करतात?निवडणुका आल्या की राजकारणाच्या शुद्धीकरणाचे वारे वाहतात. नैतिकतेवर चर्चा होते. अर्थात हे सर्व आज औषधालाही उरलेले दिसत नाही.