काळबादेवीतील कारखान्यांवरील ४० चिमण्या जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:07 AM2021-01-20T04:07:01+5:302021-01-20T04:07:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : काळबादेवी येथील सुवर्ण घडविणाऱ्या कारखान्यांवरील बेकायदा चिमणीतून बाहेर पाडणाऱ्या विषारी वायुंमुळे स्थानिक रहिवाशांचे आरोग्य ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : काळबादेवी येथील सुवर्ण घडविणाऱ्या कारखान्यांवरील बेकायदा चिमणीतून बाहेर पाडणाऱ्या विषारी वायुंमुळे स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आहे. हे कारखाने बंद करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिकांकडून केली जात आहे. त्यानुसार, गेल्या महिन्याभरात महापालिकेने येथील तब्बल ४० चिमण्या जमीनदोस्त केल्या आहेत. मात्र, कारवाईनंतर पुन्हा काही काळाने चिमण्या उभारण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
काळबादेवी, झवेरी बाजार परिसरात अडीच हजार सुवर्णकारांचे कारखाने आहेत. कायद्याचे उल्लंघन करीत हे कारखाने २४ तास सुरू असतात. कामगार येथे रात्रीचेही वास्तव्यास असून, ज्वलनशील पदार्थांच्या वापरामुळे आगीचा धाेकाही संभावताे. त्यामुळे गेले दोन दशक येथील रहिवासी या कारखान्यांचे अन्य ठिकाणी स्थलांतर व्हावे, यासाठी तक्रार करीत आहेत. केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाने गेल्या वर्षीपासून या कारखान्यांना वायू व जल प्रदूषण कायद्यांतर्गत ना हरकत प्रमाणपत्र मिळविणे बंधनकारक केले आहे.
महापालिकेमार्फत येथील बेकायदा चिमण्यांवर नियमित कारवाई केली जाते. मात्र, काही दिवसांनी या ठिकाणी पुन्हा चिमण्या बसविल्या जात आहेत. बेकायदा चिमण्यांमधून विषारी वायू बाहेर पडत असल्याने, काळबादेवीतील ५५ टक्के रहिवासी दमा व श्वसनाच्या विकारांनी त्रस्त आहेत, तसेच या कारखान्यातील अकुशल कामगार अति ज्वलनशील पदार्थ हाताळतात. बेकायदा सिलिंडर्समुळे या कारखान्यांमध्ये आगीचा धाेका संभावताे, अशी नाराजी स्थानिक रहिवाशी व्यक्त करीत आहेत.
* काळबादेवी, झवेरी बाजारतील सुवर्ण घडविणाऱ्या कारखान्यांमुळे स्थानिक रहिवाशी हैराण आहेत. या विरोधात गेले १६ वर्षे त्यांचा लढा सुरू आहे.
* अडीच हजार सुवर्ण घडविणारे कारखाने दक्षिण मुंबई परिसरात आहेत. यामध्ये अकुशल कामगार अति ज्वलनशील पदार्थ हाताळतात. बेकायदा सिलिंडर्समुळे या कारखान्यांमध्ये आगीचा धाेका संभावताे.