चार ठिकाणी ४0 स्पीड कॅमेरे बसणार
By Admin | Published: March 22, 2017 01:54 AM2017-03-22T01:54:53+5:302017-03-22T01:54:53+5:30
बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांवर मुंबई वाहतूक पोलिसांकडून निर्बंध आणले जाणार आहेत. यासाठी मुंबईतील आणखी चार ठिकाणी ४0 स्पीड कॅमेरे
मुंबई : बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांवर मुंबई वाहतूक पोलिसांकडून निर्बंध आणले जाणार आहेत. यासाठी मुंबईतील आणखी चार ठिकाणी ४0 स्पीड कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला असून, त्याचे नियोजन सुरू आहे. येत्या दीड महिन्यात त्याचे काम पूर्ण केले जाईल, अशी माहिती वाहतूक सह
पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली.
मुंबई शहर व उपनगरात मोठ्या प्रमाणात रस्ते अपघातांना तोंड द्यावे लागत आहे. २०१२ ते २०१६पर्यंत झालेल्या २,६८४ अपघातांमध्ये २ हजार ८०२ जणांना जीव गमवावा लागला. तर ११ हजार २५७ जण गंभीर जखमी झाले. मुंबईत होणारे बहुसंख्य अपघात हे दारू पिऊन आणि भरधाव वाहन चालवल्यानेच होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यातही ईस्टर्न फ्री वे आणि वांद्रे-वरळी सी-लिंकवर वाहनांच्या वेगांना मर्यादा राहत नसल्याने ‘अपघातांचा मार्ग’ अशीच त्यांची ओळख निर्माण झाली. हे पाहता या दोन्ही मार्गांवर २० स्पीड कॅमेरे बसवून वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न मुंबई पालिका व मुंबई वाहतूक पोलिसांकडून करण्यात आला. ताशी ८0पेक्षा जास्त वेगाने वाहन जात असल्यास असे वाहन स्पीड कॅमेऱ्यात कैद केले जाते आणि वाहनचालकावर ई-चलानद्वारे दंडात्मक कारवाई केली जात आहे.
आता यापाठोपाठ मुंबईतील आणखी चार ठिकाणी ४0 स्पीड कॅमेरेही बसवण्यात येणार आहेत. यात मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे रस्ते अपघात कमी करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना यासंदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. मरिन ड्राइव्ह, वांद्रे-कुर्ला संकुल, पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर हे कॅमेरे बसवण्यात येतील.
दीड महिन्यात पालिकेच्या साहाय्याने हे कॅमेरे बसवण्याचे नियोजन असल्याचे भारंबे म्हणाले. यातील मरिन ड्राइव्ह आणि वांद्रे-कुर्ला संकुल हे तर तरुणाईचे आवडते ठिकाण असून, या भागात अतिवेगाने वाहने चालविली जातात आणि त्यांच्यावर वाहतूक पोलिसांकडून कारवाईदेखील केली जाते. मात्र स्पीड कॅमेऱ्यांमुळे अशा चालकांना बराच आळा बसेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)