मनपा कर्मचाऱ्यांना हवा ४० हजारांचा बोनस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 05:55 AM2018-10-26T05:55:21+5:302018-10-26T05:55:22+5:30
महानगरपालिकेने सामुदायिक गट विमा योजना पूर्ववत सुरू करत यंदा दिवाळीत ४० हजार रुपये बोनस द्यावा, या मागणीसाठी मनपा कर्मचारी व अधिका-यांच्या सर्वपक्षीय संघटनांनी गुरुवारी आझाद मैदानात जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
मुंबई : मुंबई महानगरपालिकेने सामुदायिक गट विमा योजना पूर्ववत सुरू करत यंदा दिवाळीत ४० हजार रुपये बोनस द्यावा, या मागणीसाठी मनपा कर्मचारी व अधिका-यांच्या सर्वपक्षीय संघटनांनी गुरुवारी आझाद मैदानात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. तसेच मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही या वेळी म्युनिसिपल मजदूर युनियनचे अॅड. सुखदेव काशिद यांनी दिला आहे.
काशिद म्हणाले, सर्व कामगारांत प्रशासनाविरोधात नाराजी पसरली असल्याने कामगार संघटनांनी एकजूट दाखवत मोर्चात सहभाग घेतला आहे. त्यामुळे कामगारांच्या भावनांचा आदर ठेवत प्रशासनाने दिवाळीत ४० हजार रुपये बोनसची घोषणा करावी; तसेच मेडिक्लेम योजनेअंतर्गत ज्या कामगारांची बिले मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत, ती तत्काळ मार्गी लावावीत. अन्यथा कामगारांना टोकाचे पाऊल उचलावे लागेल.
या मोर्चासाठी म्युनिसिपल मजदूर युनियनसह म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना, मुंबई महानगरपालिका कार्यालयीन कर्मचारी-महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटना, मुंबई महानगरपालिका कर्मचारी महासंघ, मुंबई म्युनिसिपल कामगार संघ, बृहन्मुंबई मनपा कामगार कर्मचारी महासंघ, मुंबई मनपा शिक्षक सेना, बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनीअर्स युनियन, महाराष्ट्र नवनिर्माण मनपा कामगार कर्मचारी सेना या संघटनाही एकवटल्या होत्या. या सर्वपक्षीय संघटनांच्या मोर्चात हजारो कामगारांनी एकत्रित येत आझाद मैदान दणाणून सोडले.
सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर मनपा कामगार व अधिकाºयांचा १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीचा वेतन करार करण्याची कामगार नेत्यांनी व्यासपीठावरून केली.
प्रशासनाने १ जानेवारी २०१६ पासून नवीन वेतन करार करणे आवश्यक असूनही कामगार संघटनांच्या नेत्यांबरोबर कोणत्याही प्रकारची वाटाघाटी केलेली नाही. त्यामुळे कामगारांच्या रोषाचा उद्रेक होण्याआधी प्रशासनाने कामगारांच्या मागण्या मार्गी लावण्याची
मागणी कामगार नेते महाबळ शेट्टी यांनी केली.