पुनर्विकासातून म्हाडाला मिळणार चाळीस हजार घरे; लवकरच सुरू होणार सर्वेक्षणाचे काम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 01:33 AM2019-07-28T01:33:09+5:302019-07-28T01:33:18+5:30
म्हाडाच्या मोतीलालनगर या वसाहतीच्या जागेवरील रहिवाशांचे पुनर्वसन करण्यासह या ठिकाणी मायक्रो सिटी उभारण्याची घोषणा यापूर्वीच म्हाडाकडून करण्यात आली आहे.
मुंबई : मुंबईमधील घरांची म्हाडाकडे कमतरता आहे. ही कमतरता दूर करण्यासाठी आणि भविष्यातील लॉटरीमध्ये मुंबईतील घरांची संख्या वाढविण्यासाठी म्हाडाने पावले उचलली आहेत. गोरेगाव पश्चिमेला असलेल्या मोतीलाल नगर येथील १४२ एकरवर पसरलेल्या म्हाडाच्या वसाहतीचा पुनर्विकास करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. या पुनर्विकासातून म्हाडाला ४० हजार अतिरिक्त घरे उपलब्ध होणार आहेत. म्हाडाने यासाठी प्रकल्प सल्लागार म्हणून पी. के. दास या कन्सल्टन्ट कंपनीची निवड केली असून प्रत्यक्षात सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे.
म्हाडाच्या मोतीलालनगर या वसाहतीच्या जागेवरील रहिवाशांचे पुनर्वसन करण्यासह या ठिकाणी मायक्रो सिटी उभारण्याची घोषणा यापूर्वीच म्हाडाकडून करण्यात आली आहे. आता म्हाडाने प्रत्यक्षात सर्व्हे करण्याच्या कामासाठी पी. के. दास कंपनीला कंत्राट दिल्याने प्रकल्पाला गती येणार आहे. मोतीलालनगर १ आणि २ येथील रहिवाशांचा एकत्रित पुनर्विकास करताना रहिवाशांना घरे देण्यासह म्हाडाला या योजनेतून अधिकाधिक घरे मिळविण्याचा म्हाडाचा प्रयत्न असणार आहे. रहिवाशांना आधुनिक सुविधांसोबतच मैदाने, रुग्णालय, मिनी थिएटर, वृद्धाश्रम अशाही सुविधा या प्रकल्पात उपलब्ध केल्या जाणार आहेत. हा प्रकल्प पूर्णत्वास येताना म्हाडाला अधिकाधिक एफएसआयचा वापर करून ४० हजार घरे अतिरिक्त उपलब्ध होतील असा अंदाज आहे. तसा अहवाल प्रत्यक्ष सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर म्हणजे आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात सादर केला जाणार आहे.
या पुनर्विकास प्रक्रियेला प्रत्यक्षात सुरुवात होण्यापूर्वी सर्व रहिवाशांना संपूर्ण प्रकल्प नेमका कसा असेल याविषयीचे सादरीकरण दाखविले जाणार आहे. सर्व रहिवाशांच्या पुनर्विकासासाठी अंदाजे ३० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
इतक्या मोठ्या प्रमाणात घरे उपलब्ध झाल्यामुळे खासगी विकासकांनी बांधलेल्या घरांच्या किमतीही आटोक्यात येऊ शकतात, असे म्हाडाच्या मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण यांनी स्पष्ट केले. सर्वेक्षणाचा अहवाल येताच प्रत्यक्ष कामासाठी निविदा मागविण्यात येणार आहेत. कामाला प्रत्यक्षात आॅक्टोबर महिन्यात सुरुवात करण्याचा म्हाडाचा मानस आहे. पुनर्विकास करताना तेथील रहिवाशांचे स्थलांतर न करता तिथेच त्यांना संक्रमण शिबिरे उपलब्ध करून दिली जातील, असेही चव्हाण यांनी या वेळी सांगितले.
वाढीव एफएसआयमुळे फायदा
मोतीलाल नगर १ आणि २ या दोन्ही वसाहतींच्या पुनर्विकास प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे. सुरुवातीला या प्रकल्पातून १८-२० हजार घरे मिळण्याचा अंदाज होता. मात्र वाढीव एफएसआयमुळे अतिरिक्त घरे म्हाडाला मिळणार असून सुमारे ४० हजार घरे म्हाडाला उपलब्ध होतील, असे म्हाडाच्या मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण म्हणाले. तसेच गेली अनेक वर्षे म्हाडाच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या मुंबईकरांना ही फार मोठी संधी मिळणार आहे.