मुंबई : २०२३ची सुरुवात ‘पठाण’रूपी ब्लॉकबस्टरने झाल्यानंतर वर्षाचा शेवट एक नव्हे, तर दोन ब्लॉकबस्टर सिनेमे देत गोड होणार असल्याचे चिन्ह दिसू लागले आहे. यंदा
बॉक्स ऑफिसवरील शेवटचे युद्ध ‘डंकी’ आणि ‘सालार पार्ट १ - सीझफायर’ या दोन मोठ्या सिनेमांमध्ये रंगणार आहे. २१ आणि २२ डिसेंबरची प्रेक्षकही आतुरतेने वाट पाहत असून, ॲडव्हान्स बुकिंगची शर्यत सुरू झाली आहे. या युद्धातील पहिला टप्पा ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ला होणारी कमाई आणि पहिल्या दिवशी कोण किती बिझनेस करणार हा आहे.
केवळ २४ तासांच्या अंतराने भारतीय सिनेसृष्टीतील शाहरुख खान आणि प्रभास हे दोन बडे स्टार्स आमनेसामने उभे ठाकणार आहेत. ‘डंकी’ आणि ‘सालार’ या दोन्ही चित्रपटांच्या पब्लिसिटी, मार्केटिंग, वितरण टिमने कंबर कसली आहे. विविध युक्त्या लावून रसिकांना आपापल्या चित्रपटांकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
एकीकडे एका वर्षात तिसरा ब्लॉकबस्टर देण्यासाठी सज्ज झालेल्या शाहरुखने ‘डंकी’च्या रिलीजपूर्वी वैष्णो देवी आणि साईबाबांचे दर्शन घेत देवादिकांसह संतांचाही आशीर्वाद घेतला आहे, तर प्रभास सर्वतोपरी चित्रपटाचे प्रमोशन करण्यात बिझी आहे.
मुंबईमध्ये प्रभासचे १२० फूट उंच कटआऊट लावून ‘सालार’च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रमोशनचा एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. कोणत्याही कलाकाराचे आजवरचे देशातील हे सर्वात मोठे कटआऊट आहे.
ॲडव्हान्स बुकिंगच्या माध्यमातूनही दोन्ही चित्रपटांनी रणशिंग फुंकले आहे. ‘डंकी’चे ४ कोटी ७१ लाख रुपयांहून अधिक ॲडव्हान्स बुकिंग झाले असून, दीड लाखांहून अधिक तिकिटांची विक्री झाली आहे. ॲडव्हान्स बुकिंगच्या माध्यमातून ‘सालार’ने ३ कोटी ८६ लाख रुपयांहून अधिक गल्ला जमवला असून, याची १ लाख ५९ हजारांपेक्षा अधिक तिकिटे विकली गेल्याची माहिती मिळाली आहे. ४०० कोटी रुपये बजेट असलेल्या ‘सालार’ला १२० कोटी खर्चून बनवण्यात आलेला ‘डंकी’ तगडे आव्हान देणार आहे.
‘डंकी’चे एक हजारहून अधिक स्पेशल शोज :
‘डंकी’ने अर्ली शोचा विक्रम आपल्या नावे केला आहे. यापूर्वी शाहरुखच्याच ‘जवान’ चित्रपटाचा पहिला शो सकाळी ६ वाजता दाखवण्यात आला होता. हा विक्रमही मोडीत काढत ‘डंकी’चा पहिला शो पहाटे ५ वाजून ५५ मिनिटांनी आयोजित करण्यात आला आहे. देशातील २४० पेक्षा अधिक शहरांमध्ये फर्स्ट डे फर्स्ट शो इव्हेन्ट होणार आहे. याखेरीज शाहरूख खान युनिव्हर्सने जगभर ‘डंकी’चे एक हजारहून अधिक स्पेशल शोज आयोजित केले आहेत.