मुंबई : गुढीपाडव्याने आता मुंबई नटू लागली असतानाच साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या या मुहूर्तावर सोने खरेदीला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, असा विश्वास सराफा बाजारातून व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्ताने लग्नासाठी होणारी खरेदी- विक्री मोठ्या प्रमाणावर होईल. ग्राहक सोन्याच्या नाण्यांऐवजी दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणावर करतील. या निमित्ताने मुंबईच्या सराफ बाजारात सुमारे चारशे कोटी सोन्याच्या खरेदी विक्रीचे व्यवहार होतील, असाही विश्वास सराफ बाजाराने व्यक्त केला आहे. दरम्यान, कोरोनामुळे गुढीपाडवा साजरा करता आला नव्हता. यंदा उत्साह असून दागिन्यांबरोबरच अन्य वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होऊ लागल्याने व्यापाऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे.
लग्नाचे मुहूर्तगुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर लग्नासाठी लागणाऱ्या दागिन्यांची खरेदीही मोठ्या प्रमाणात होईल. कोरोनानंतर होणारी ही खरेदी मोठी असेल. जुलैपर्यंत लग्नाचे मुहूर्त आहेत. देशभरात ७० लाख लग्न होतील. पाडव्याच्या मुहूर्तावर देशभरात सुमारे ३१५ लाख कोटींच्या सोन्याच्या खरेदी विक्रीचे व्यवहार होतील.- कुमार जैन, अध्यक्ष, मुंबई ज्वेलर्स असोसिएशन
किती असेल भाव? पाडव्याला सोन्याचा भाव प्रति तोळा ६० हजार रुपये राहील. सोन्याच्या नाण्यांऐवजी दागिन्यांची खरेदी करण्यावर भर जास्त असेल. मुंबईत खरेदी विक्रीचे व्यवहार ४०० कोटी रुपयांच्या आसपास होतील. सर्वसाधारण दिवशी मुंबईत सोने खरेदी विक्रीचे व्यवहार २०० कोटी रुपयांच्या आसपास होतात.
वर्षभर भराभराट सोने खरेदी दागिन्यांपुरताच मर्यादित विषय राहिलेला नाही. ती गुंतवणूकही मानली जाते. वर्षाच्या पहिल्या दिवशी केली जाणारी गुंतवणूक वर्षभर भराभराट करणारी ठरेल. या विचाराने थोडे का होईना सोने खरेदी केले जाते.
झवेरी बाजार २०० वर्षे जुना आहे. आज ६० हजार तोळा झाले आहे. झवेरी बाजारात ५ ते ७ लाख कारागीर आहेत. झवेरी बाजारात ३ हजार दुकाने आहेत. कारखाने आणि कार्यालय ३५ हजार आहेत. येथील सोने संपूर्ण आशियातील बाजारपेठेत विकले जाते.