मिठागरपाडा पुरातून ४०० जणांची सुटका
By admin | Published: September 23, 2016 03:04 AM2016-09-23T03:04:45+5:302016-09-23T03:04:45+5:30
बुधवारी रात्री नऊनंतर सुरु झालेल्या पावसाने अक्षरश: झोडपून काढल्याने. सकाळी सहा वाजता वसई विरारला पूरस्थिती निर्माण झाली होती.
शशी करपे, वसई
वसई : बुधवारी रात्री नऊनंतर सुरु झालेल्या पावसाने अक्षरश: झोडपून काढल्याने. सकाळी सहा वाजता वसई विरारला पूरस्थिती निर्माण झाली होती. मिठागर पाड्यात चारशे लोक अडकून पडले होते. तर वालीव येथे रात्री नाल्यात एकजण वाहून गेला. सकाळी आठ वाजल्यानंतर पाऊस थांबल्याने पाणी ओसरले व लोकांना दिलासा मिळाला.
गेल्या १५ सप्टेंबरपासून कोसळत असलेल्या पावसाने बुधवारी रात्री वसई विरारमध्ये थैमान घातले. पहाटेपर्यंत पावसाने अक्षरश: झोडपून काढले. त्यामुळे वसई विरार परिसरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. वसई पूर्वेकडील मिठागर पाड्याला पुन्हा एकदा पूर आल्याने १२५ घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे चारशे लोक अडकून पडले होते. पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानाने सकाळी साडेदहा वाजता मदतकार्य सुरु करून २५ लोकांना सुरक्षितपणे हरवले.
घरात पाणी शिरल्याने काही लोकांनी इलेक्ट्रीक टॉवरचा आसरा घेतला होता. तर बहुतेक लोक उंचावर असलेल्या घरात जाऊन बसले होते. खाडी किनारी वसलेल्या मीठागर पाड्यात समुद्राला भरती आल्यानंतर नेहमी पुराचा तडाखा बसतो. पहाटे पाड्यात पाणी शिरू लागल्यानंतर लोक सुरक्षितस्थळी गेले होते. पालिकेचे मदतकार्य सुरु झाल्यानंतर २५ जणांना बाहेर काढण्यात आले. पाऊस थांबल्यानंतर पाणी ओसरू लागल्याने दिलासा मिळाला. नगरसेविका किरण चेंदवणकर यांनी लोकांना दुपारचे जेवण पुरवले. वालीव-सातिवली रस्त्यावर असलेल्या साई रेसिडेंसी हॉटेल जवळ काल रात्री राजकुमार गौतम हा रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून जात असताना अंदाज न आल्याने गटारात पडून वाहून गेला. वसई विरार अग्निशमन विभागाचे कर्मचारी त्याचा शोध घेत आहेत.
विरारमध्ये अनेक भागात पाणी साचले
विरार : रात्रभर कोसळत असलेल्या पावसाने वसई विरार परिसरातील अनेक भागात पाणी साचून राहिले होते. विरारमधील मनवेलपाडा रोड, संत नगर, तारवाडी, यशवंतनगर, कॉलेज रोड, नालासोपाऱ्यात तुळींज पोलीस स्टेशन परिसर, सेंट्रल पार्क रस्ता, नगीनदास पाडा रोड, तुळींज, आचोळे, वसंत नगरी, एव्हरशाईन, अंबाडी रोड, वालीव, गास, उमराळे, नाळे, वाघोली, नानभाट, नवघर-माणिकपूर, चुळणे-गास रोड, वसई कोळीवाडा यासह अनेक भागात पाणी साचून राहिले होते.
विरार शहरातील अनेक दुकानांमध्ये पाणी घुसले होते. त्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. तर पाणी साचून राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. विरारमध्ये संतनगर आणि तारवाडीत पाणी शिरल्याने नगरसेवक प्रशांत राऊत यांनी आज दुपारी लोकांच्या जेवणची सोय केली होती.
रात्री उशिरापर्यंत याठिकाणचे पाणी घालवण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने मदतकार्य सुरु ठेवले होते. दरम्यान, सकाळी आठ वाजल्यापासून पाऊस थांबल्याने पाणी ओसरू लागले होते. दुपारपर्यंत पाण्याची पातळी एकदम कमी झाल्यानंतर लोकांना दिलासा मिळाला. पाणी साचून राहिल्याने अनेक ठिकाणी शाळा आणि कॉलेजने सुट्टी देण्यात आली होती.
वारांगडे येथील सूर्या उजव्या कालव्याचा बंधारा फुटला
पंकज राऊत , बोईसर
मान ग्रामपंचायत हद्दीतील वारांगडे जवळील सूर्या उजव्यातील कालव्यातील बंधारा (स्लॅब ड्रेन) बुधवार दि. २२ च्या मध्यरात्री एकच्या सुमारास अतिवृष्टीमुळे फुटल्याने परिसरातील आदिवासींच्या घरात व शेतात तसेच वसाहतीत प्रचंड पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे.
श्रीनिवास पार्कमधील दिनेश पाटील यांना वीजेचे उपकरण बंद करातांना शॉक लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. धावशी पाड्यातील गोर-गरीब आदिवासींच्या घरात पाणी शिरल्याने घरातील भाताचा कळंगा भिजून भात, तांदूळ, कडधान्य भिजून नुकसान झाले तर कपडे व भांडी वाहून गेले तर श्रीनिवास पार्क व परिसरातील वसाहतीमध्ये पाणी साडे तीन ते चार फुटांपर्यत शिरल्याने घरातील मौल्यवान वस्तूंसह वाहनांचेही नुकसान झाले आहे. आदिवासी पाड्यांवरील लोकवस्तीसह सुमारे चाळीस ते पन्नास घरात पाणी शिरल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
गुरुवारी घटनास्थळी सूर्या प्रकल्प सिंचन शाखा वाणगाव/सूर्यानगर चे कनिष्ठ अभियंता व शाखाधिकारी प्रकाश संखे यांनी प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. महसूल विभागाकडून तलाठी साधना चव्हाण यांनी काही घरे व शेतीचा पंचनामा आज केला तर रात्री मुसळधार पाऊस सुरू असतानाच अचानक पाण्याचा प्रवाह वाढून मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने श्रीनिवास पार्क मधील रहिवाशांचा एकच गोंधळ झाला. श्रीनिवास पार्क मधील रहिवाशांनी बोईसर पोलीस व अग्निशमनदलाशी रात्री संपर्क साधूनही प्रतिसाद न मिळाल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत होता.