१० मिनिटांच्या प्रवासासाठी मोजावे लागताहेत ४०० रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 09:00 AM2022-12-14T09:00:28+5:302022-12-14T09:00:39+5:30

अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणारा गोखले पूल सन १९७५ मध्ये बांधण्यात आला होता. हा पूल ३ जुलै २०१८ रोजी कोसळून दोन जणांचे मृत्यू झाले होते.

400 rupees for a 10 minute journey in mumbai | १० मिनिटांच्या प्रवासासाठी मोजावे लागताहेत ४०० रुपये

१० मिनिटांच्या प्रवासासाठी मोजावे लागताहेत ४०० रुपये

Next

मनीषा म्हात्रे, रतींद्र नाईक
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणारा गोखले पूल बंद झाल्याने पूर्व-पश्चिमेच्या प्रवासाकडे टॅक्सी, रिक्षाचालक ‘टाइम की खोटी कौन करेगा’ म्हणत थेट हात जोडत आहे. तर, काही जण अवघ्या १० मिनिटांच्या प्रवासासाठी ४००  ते ५०० रुपयांची मागणी करत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला नाहक फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. तर, गृहिणींसह नोकरदार मंडळींनी थेट ब्रीजवरून पायी जाण्याला पसंती दिल्याचेही दिसून आले.

अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणारा गोखले पूल सन १९७५ मध्ये बांधण्यात आला होता. हा पूल ३ जुलै २०१८ रोजी कोसळून दोन जणांचे मृत्यू झाले होते. या पार्श्वभूमीवर महापालिकेने आपल्या हद्दीमधील पुलांचे नव्याने बांधकाम एप्रिलपासून सुरू केले आहे. मात्र रेल्वे हद्दीमधील भागही धोकादायक झाल्याच्या तक्रारी आल्याने हा भागही पाडण्यात येणार आहे. यासाठी ७ नोव्हेंबरपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. रेल्वे हद्दीमधील धोकादायक भाग रेल्वेकडून पाडण्यात आल्यानंतर पालिकेकडून गर्डर बसवण्याचे काम केले जाणार आहे.

अंधेरीत एस. व्ही. रोडसह लिंक रोडवर नेहमीच होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे अंधेरी (पश्चिम) येथील वर्सोवा, चार बंगला, सात बंगला, यारी रोड, डी. एन. नगर, स्वामी समर्थनगर, जुहू आदी परिसरातून पश्चिम द्रुतगतीमार्गे बोरिवली व दक्षिण मुंबईत जाण्यासाठी गोखले पूल हा सर्वांत जवळचा मार्ग ठरतो. या पुलावरून दररोज १० ते १२ हजार वाहनांची ये-जा होते.  गोखले पूल बंद करण्यात आल्याने अंधेरी परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. याचा सर्वात जास्त फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसत आहे. तसेच, लोखंडवाला, यारी रोड, सात बंगला भागात उच्चभ्रू लोकवस्ती असल्यामुळे गाड्यांची संख्या मोठी आहे. त्यांनाही फटका बसला आहे.

पूल पाडेपर्यंत छोट्या वाहनांसाठी एक मार्गिका सुरू करता येईल का, याची चाचपणी महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. पूल रेल्वेकडून पाडण्यात येणार असून, यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. तर, पूल पाडल्यानंतर पालिकेकडून बांधण्यात येणार आहे. यासाठी पालिकेने ८४.७२ कोटी खर्चाची निविदा मागवली आहे. मे २०२३ पर्यंत पुलाची एक मार्गिका सुरू करण्याचा पालिकेचा प्रयत्न राहणार आहे. पालिकेने तातडीने पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
 

Web Title: 400 rupees for a 10 minute journey in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.