Join us

पोलीस भूखंडातील ४०० चौरस मीटर जागा गायब

By admin | Published: April 16, 2016 2:45 AM

मुंबई पोलिसांच्या मालकीच्या ताडदेव येथील मोक्यावरील जागावाटपात झालेल्या गैरप्रकाराच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) सुरू केलेल्या प्राथमिक चौकशीसाठी वारंवार

- डिप्पी वांकाणी, मुंबई

मुंबई पोलिसांच्या मालकीच्या ताडदेव येथील मोक्यावरील जागावाटपात झालेल्या गैरप्रकाराच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) सुरू केलेल्या प्राथमिक चौकशीसाठी वारंवार पत्रव्यवहार करूनही म्हाडा आणि जिल्हा अधिकाऱ्यांकडून प्रतिसादच मिळत नाही. या जागेवर इम्पिरियल टॉवर उभा आहे.‘लोकमत’ने २५ जून २०१५ रोजी या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले होते. एस. डी. कॉर्पोरेशनने एसआरए प्रकल्प कार्यान्वित केला होता. त्यावर इम्पिरियल टॉवर उभा राहिला. १९८९ मध्ये महसूल विभागाने झोपड्यांच्या पुनर्विकासासाठी आदेश काढले होते. एम. पी. मिल कम्पाउंड या नावाने तो ओळखला जातो. या प्रकल्पातील ४२,६०० चौरस मीटर्सवर झोपडपट्टीत राहणाऱ्यांनी अतिक्रमण केलेले आहे. ३३,१०० चौरस मीटर जागा पुनर्विकासासाठी असून ९,५०० चौरस मीटर जागेवरील अतिक्रमण हटवून ती जागा, जागेचे मालक मुंबई पोलिसांकडे हस्तांतरित करायची होती. तथापि, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने ३ सप्टेंबर २००५ रोजी लिहिलेल्या आपल्या उद्देशपत्रात (लेटर आॅफ इंटेंट) महसूल विभागाच्या आदेशानुसार पोलिसांना ९,१०० चौरस मीटरऐवजी ३,०२५.७५ चौरस मीटरचा बिल्टअप एरिया हस्तांतरित करावा, असे आदेश दिले होते.महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाचे तत्कालीन पोलीस महासंचालक अरूप पटनाईक यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना लिहिलेल्या पत्रात ४०० चौरस मीटरची जागा गूढरीत्या कमी झाल्याची चौकशी करावी, असे म्हटले होते. आम्ही प्राथमिक चौकशी सुरू केली असून ४०० चौरस मीटरची जागा २००५ मध्ये कमी का आली, हे शोधणे हे आमच्या चौकशीचे क्षेत्र आहे. महसूल विभागाने ही जमीन पुनर्विकासासाठी म्हाडाकडे हस्तांतरित केली होती व पोलिसांना ९५०० चौरस मीटर जागा (प्लॉट) देण्यात यावी असे स्पष्टपणे म्हटले होते, असे वरिष्ठ ईओडब्लू अधिकाऱ्याने सांगितले.दस्तऐवजाची केली मागणीईओडब्लूने म्हाडा आणि जिल्हाधिकाऱ्यांना तीन वेळा पत्र लिहून ही जागा कमी करण्याचा निर्णय कधी घेण्यात आला, हे शोधण्यासाठी प्रकल्पाच्या दस्तऐवजाची मागणी केली आहे. आमच्या पत्रांना दोघांकडूनही प्रतिसाद मिळालेला नाही. आम्हाला ही कागदपत्रे मिळताच आमच्याकडून चौकशी सुरू होईल, असे अधिकारी म्हणाला.