Join us

क्रांतिकारकारकांच्या सन्मानार्थ ४०० विद्यार्थ्यांनी केले वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या क्रांतिकारकारक आणि सैनिकांची आठवण केवळ १५ ऑगस्ट, २६ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या क्रांतिकारकारक आणि सैनिकांची आठवण केवळ १५ ऑगस्ट, २६ जानेवारी किंवा कारगिल दिवसाला काढली जाते. पण या महान व्यक्तींच्या स्मृती कायमस्वरूपी जपल्या जाव्यात यासाठी दादरच्या राष्ट्र सेविका समितीने विशेष उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार शनिवारी क्रांतिकारकारकांच्या सन्मानार्थ विद्यार्थ्यांच्या हस्ते ४०० झाडे लावण्यात आली.

पालघरच्या वाडा तालुक्यातील वनवासी क्षेत्रात हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. ज्ञानदा प्रबोधन संस्था आणि राष्ट्राभिमानी सेवा समितीचे त्यास सहकार्य लाभले. गेल्या ५ वर्षांपासून दादरस्थित या संस्थांकडून ‘एक वृक्ष क्रांतिकारक आणि सैनिकांसाठी’ ही मोहीम राबविली जात आहे. शनिवारी ‘वृक्ष वल्ली सन्मान-२०२२’ स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. माधवराव काणे आश्रम शाळा, मळवाडा जिल्हा परिषद शाळा, अरविंदराव पेणसे आश्रम शाळांना या मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले असून, पहिल्या टप्प्यात ५ ते १२ इयत्तेतील ४०० मुलांना प्रत्येकी एका फळझाडाचे रोपटे देण्यात आले.

हे रोपटे देशासाठी हुतात्मा झालेल्या क्रांतिकारक, सैनिकांना समर्पित करायचे असून, त्यांच्या शौर्याबद्दल निबंध लिहायचा आहे. १५ ऑगस्ट २०२२पर्यंत जो विद्यार्थी या वृक्षाचे उत्तमरीत्या संगोपन करील त्याला ‘वृक्षवल्ली सन्मान - २०२२’ देऊन गौरवण्यात येणार आहे. देशासाठी लढलेल्या क्रांतिकारक, सैनिकांच्या शौर्य व त्यागाबद्दल माहिती शालेय विद्यार्थ्यांना मिळावी, त्यांच्या मनात या वीरपुरुषांबद्दल आत्मियता निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील हेतू आहे.