४०० रुपये वाचविण्याच्या नादात गमावले साडेदहा हजार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 06:36 AM2019-04-06T06:36:46+5:302019-04-06T06:37:10+5:30
पवईतील रहिवासी पीयूष सिन्हा (२५) हा येथील हिरानंदानीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून नोकरी करतो.
मुंबई : विमान तिकीट बुक केल्यास चारशे रुपये वाचतील म्हणून पवईतील तरुणाने ‘गुगल पे’वरून तिकीट बुक केले. ते बुक न झाल्याने गुगलवरून ‘यात्रा डॉट कॉम’वरील नंबर सर्च करून तेथे विचारणा केली आणि चारशे रुपयांसाठी त्याची साडेदहा हजारांची फसवणूक झाली.
पवईतील रहिवासी पीयूष सिन्हा (२५) हा येथील हिरानंदानीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून नोकरी करतो. तेथेच काम करणाऱ्या मैत्रिणीला २६ एप्रिलचे कोलकाताला जाण्यासाठी विमान तिकीट काढायचे होते. गुगल पेवरून तिकीट बुक केल्यास चारशे रुपयांची सवलत होती. त्यामुळे त्याने १ एप्रिल रोजी डेबिट कार्डवरून तिचे तिकीट बुक केले. तेव्हा ९ हजार ७३३ रुपये डेबिट झाले. ते त्याला परत मिळाले. मात्र तिकीट बुक झाले नाही, म्हणून त्याने गुगलवरून यात्रा डॉट कॉमचा क्रमांक शोधून त्यावर विचारणा केली. तेव्हा, त्यांनी पीयूषकडून बँक खाते तसेच तिकिटासंदर्भात माहिती घेतली. पुढे मोबाइलवर आलेला संदेश फॉरवर्ड करण्यास सांगितला. त्यानुसार, त्याने तो संदेश पाठवला. थोड्याच वेळाने त्याच्या खात्यातून साडेदहा हजार काढल्याचा संदेश आला. याप्रकरणी त्याने शुक्रवारी पवई पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार पोलीस अधिक तपास करीत आहेत.