Join us

मुंबईत 4000 भेसळयुक्त अंडी पकडली, प्लास्टिकची असल्याची शक्यता!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2020 10:20 PM

येत्या 15 दिवसात या अंड्यांबाबत अहवाल सादर केला जाणार

- मनोहर कुंभेजकर

मुंबई : मुंबई महापालिकेच्या आर मध्य व आर उत्तरच्या प्रभाग समिती अध्यक्षा संध्या विपुल दोशी यांनी आज दुपारी कांदिवली पश्चिम चारकोपला सुमारे 4000 भेसळयुक्त अंड्यांचे दोन टेम्पो शिवसैनिकांच्या मदतीने पकडले. त्यानंतर ते चारकोप पोलिसांच्या ताब्यात दिले. सदर अंडी ही चायनीज असून ती प्लास्टिकची असल्याचा दावा संध्या विपुल दोशी यांनी 'लोकमत'शी बोलताना केला आहे. याबाबत चारकोप पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला असून पोलिसांनी सदर दोन टेम्पोना सील ठोकले आहे. तसेच, येत्या 15 दिवसात या अंड्यांबाबत अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती या अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती संध्या विपुल दोशी यांनी दिली आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या तीन दिवसांपासून कांदिवली पश्चिम चारकोप सेक्टर 2 येथे एकांत सोसायटीत राहणाऱ्या अनुज केशव भुवड यांना येथील अनधिकृत अंड्यांच्या दुकानाच्या अंडी खरेदी करताना अंड्यात तफावत आढळली. आज दुपारी 12च्या सुमारास अनुज भुवड यांनी अंडी खरेदी केल्यावर त्यांना ही अंडी भेसळयुक्त आढळली. यावेळी अनुज भुवड व दुकानदार यांच्यातील शाब्दिक बातचीत येथे आलेल्या आर मध्य व आर उत्तरच्या प्रभाग समिती अध्यक्षा संध्या विपुल दोशी व त्यांचे पती विपुल दोशी यांनी ऐकली आणि त्या अंडी विक्रेत्याला जाब विचारला. त्यानंतर अंडी सप्लायरच्या दोन टेम्पोमधील 4000 अंडी दोशी दाम्पत्यांनी व शिवसैनिकांनी ताब्यात घेतली आणि चारकोप पोलिस ठाण्यात धाव घेतली.

पोलीस सुरवातीला तक्रार घेत नव्हते. मात्र, संध्या दोशी यांनी अन्न व औषध संचलनालयच्या आयुक्त पल्लवी दराडे यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडे सदर भेसळ अंड्याची तक्रार केली. त्यांनी आपले दोन अधिकारी घटनास्थळी पाठवले. त्यानंतर चारकोप पोलिसांनी या अंड्यांचे टेम्पो सील केले आहेत. तसेच, येत्या 15 दिवसात या अंड्याबाबत अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती या अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती संध्या विपुल दोशी यांनी दिली आहे.

याशिवाय, ग्राहक अनुज यांचे पती केशव भुवड यांनी गेले तीन दिवस अंड्यांमध्ये प्लास्टिकसारखा तरल पदार्थ आढळला. तसेच, अंडे फोडल्यावर त्यांना नेहमीसारखा उग्र दर्प आला नाही.त्यामुळे त्यांनी चारकोप सेक्टर 8 च्या नाक्यावरील अंडे विक्रेत्याला जाब विचारला. मात्र विक्रेत्याने आम्ही अंडी घरी बनवत नाही अशी उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर सदर भेसळ युक्त अंडी ही नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक असून यावर कारवाई करावी, अशी तक्रार केशव भुवड यांनी चारकोप पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल शिंदे यांच्याकडे केली आहे. 

टॅग्स :मुंबईगुन्हेगारी