लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महाराष्ट्रात ह्युंदाई कंपनीकडून ४ हजार कोटींची गुंतवणूक होणार असून, पुण्यात पहिला प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या गुंतवणुकीतून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार आहे. याबरोबरच दक्षिण कोरियातील लोट्टे ग्रुप, एल.जी. इलेक्ट्रॉनिक्स कंपनीसुद्धा राज्यात गुंतवणूक करणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
कोरिया दौऱ्यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत उदय सामंत म्हणाले, द. कोरियामधील आइस्क्रीम बनविणारी आघाडीची कंपनी लोट्टे उद्योगसमूहसुद्धा पुण्यात ४७५ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. कंपनीच्या ‘हॅवमोअर’ या ब्रँडचे उत्पादन या प्रकल्पात होणार आहे. त्याचप्रमाणे जनरल मोटर्स कंपनीच्या कामगारांचे प्रश्न सोडविण्यासंदर्भात ह्युंदाईच्या व्यवस्थापनासोबत सकारात्मक चर्चा झाली.
पाण्याच्या फिल्टरमध्ये असलेल्या ॲल्युमिनिअम झाकणीचा प्रकल्पही राज्यात येणार आहे. त्यासाठी ५ एकर जागेची मागणी कंपनीकडून करण्यात आली आहे. एल.जी. कंपनीने पुण्यातील प्रकल्पाचा विस्तार करून जवळपास ९०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
राज्यस्तरीय उद्योग पुरस्कार २० ऑगस्टला
राज्यातील पहिल्या उद्योगरत्न पुरस्कार वितरणाचा सोहळा २० ऑगस्ट रोजी दु. २ वाजता जिओ सेंटर, बीकेसी, मुंबई येथे होणार आहे. टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. उद्योगमित्र पुरस्कार सिरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांना, मराठी उद्योजक पुरस्कार नाशिक येथील सह्याद्री समूहाचे विलास शिंदे यांना, तर महिला उद्योजक पुरस्कार किर्लोस्कर समूहाच्या गौरीताई किर्लोस्कर यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहितीही मंत्री सामंत यांनी दिली.