मुंबईत मालाडच्या ४ हजार रिक्षा चालकांना मिळाले कोरोना सुरक्षा कवच; भाजपचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 04:47 PM2021-05-21T16:47:23+5:302021-05-21T16:47:46+5:30
कोरोनाची लागण झाल्याची लक्षणे दिसू लागताच नागरिक कोरोनाची चाचणी करण्यासाठी किंवा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यास नागरिक स्वतःच्या कारने न जाता अनेक वेळा रिक्षाने हॉस्पिटलमध्ये जातात.
मनोहर कुंभेजकर
मुंबई-कोरोनाची लागण झाल्याची लक्षणे दिसू लागताच नागरिक कोरोनाची चाचणी करण्यासाठी किंवा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यास नागरिक स्वतःच्या कारने न जाता अनेक वेळा रिक्षाने हॉस्पिटलमध्ये जातात. मात्र यावेळी रिक्षा चालकांना माहित नसते की सदर प्रवासी हा कोविड पॉझिटिव्ह आहे. आणि तो दिवसभर स्वतःच्या रोजी रोटीसाठी रिक्षा चालवतो. तो स्वतः पॉझिटिव्ह होतो, त्याच्या कुटुंबाला आणि आणि त्याच्या रिक्षात दिवसभर बसलेल्या अनेक प्रवाश्यांना तो कोरोनाची लागण करतो.
त्यामुळे रिक्षा चालक आणि प्रवाश्यांची सुरक्षा लक्षात घेऊन मालाड पूर्व व मालाड पश्चिम भागातील 4000 रिक्षा चालकांसाठी मुंबई भाजपाचे सचिव विनोद शेलार यांनी कोरोना सुरक्षा कवचाची योजना राबवली.
एकीकडे रिक्षा चालकांना 1500 रुपये घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली,मात्र अजूनही रिक्षा चालकांच्या हातात सदर रक्कम मिळाली नाही.आणि सध्या कोरोनाच्या लॉकडाऊन मध्ये रिक्षा चालकांचा पोट भरण्यापूरता धंदा सुद्धा नाही.अश्या कठीण परिस्थितीत रिक्षावाले धोका पत्करून आपला व्यवसाय करत आहे. आणि अश्या परिस्थितीत कोरोना सुरक्षा कवच विकत घेणे रिक्षा चालकांना कठीण आहे. त्यामुळे रिक्षा चालकांची आणि प्रवाश्यांची सुरक्षा लक्षात घेऊन मालाडच्या सुमारे 4000 रिक्षा चालकांसाठी कोरोना सुरक्षा कवच योजना राबवल्याचे विनोद शेलार यांनी लोकमतला सांगितले.
रिक्षाचालक आणि प्रवासी यामध्ये जाड प्लॅस्टिकची शिल्ड असलेले हे कोरोना सुरक्षा कवच आहे. मालाड पश्चिम येथील मढ, आंबोज वाडी,मालवणी,मालाड पूर्व स्टेशन येथील राणी सती मार्ग व दफ्तरी रॉड येथील 5 ठिकाणी उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी,कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या हस्ते या कोरोना सुरक्षा कवचाचे वितरण करण्यात आले.उद्योगपती अनिल मुरारका यांचे या योजनेला मोलाचे सहकार्य मिळाले.
खासदार गोपाळ शेट्टी व कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी विनोद शेलार यांच्या या योजनेचे कौतुक केले आहे. कोरोना सुरक्षा कवचा मुळे एकीकडे रिक्षाचालक आणि प्रवासी यांची सुरक्षा अबाधित राहील आणि कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी अनिल विश्वकर्मा,गुरूदयाळ यादव,मंगेश चौधरी,संदीप मिश्रा,सुरेंद्र यादव व मुन्ना गुप्ता उपस्थित होते.