Join us

मालाडच्या ४००० रिक्षाचालकांना मिळाले कोरोना सुरक्षा कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 4:07 AM

मनोहर कुंभेजकरलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाची लागण झाल्याची लक्षणे दिसू लागताच नागरिक कोरोनाची चाचणी करण्यासाठी किंवा कोरोना ...

मनोहर कुंभेजकर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाची लागण झाल्याची लक्षणे दिसू लागताच नागरिक कोरोनाची चाचणी करण्यासाठी किंवा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यास नागरिक अनेकदा रिक्षाने लॅबमध्ये व हॉस्पिटलमध्ये जातात. मात्र रिक्षाचालकांना माहिती नसते की सदर प्रवासी हा कोविड पॉझिटिव्ह आहे. तो दिवसभर स्वतःच्या रोजीरोटीसाठी रिक्षा चालवतो. त्यामुळे काेराेना पॉझिटिव्ह होतो, त्याच्या कुटुंबाला आणि त्याच्या रिक्षात दिवसभर बसलेल्या अनेक प्रवाशांना तो कोरोनाची लागण करतो.

त्यामुळे रिक्षाचालक आणि प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन मालाड पूर्व व मालाड पश्चिम भागातील ४००० रिक्षा चालकांसाठी मुंबई भाजपचे सचिव विनोद शेलार यांनी कोरोना सुरक्षा कवचची योजना राबवली.

एकीकडे रिक्षाचालकांना १५०० रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली, मात्र अजूनही रिक्षाचालकांच्या हातात सदर रक्कम मिळाली नाही. सध्या कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये रिक्षाचालकांचा पोट भरण्यापुरता धंदाही नाही. अशा कठीण परिस्थितीत रिक्षाचालक धोका पत्करून आपला धंदा करत आहे आणि अशा परिस्थितीत कोरोना सुरक्षा कवच विकत घेणे रिक्षाचालकांना कठीण आहे. त्यामुळे रिक्षाचालकांची आणि प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन मालाडच्या सुमारे ४००० रिक्षा चालकांसाठी कोरोना सुरक्षा कवच योजना राबवल्याचे विनोद शेलार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

रिक्षाचालक आणि प्रवासी यामध्ये जाड प्लॅस्टिकची शिल्ड असलेले हे कोरोना सुरक्षा कवच आहे. मालाड पश्चिम येथील मढ, आंबोज वाडी, मालवणी, मालाड पूर्व स्टेशन येथील राणी सती मार्ग व दफ्तरी रॉड येथील ५ ठिकाणी उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी, कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या हस्ते या कोरोना सुरक्षा कवचचे वितरण करण्यात आले. उद्योगपती अनिल मुरारका यांचे या योजनेला मोलाचे सहकार्य मिळाले.

खासदार गोपाळ शेट्टी व कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी विनोद शेलार यांच्या या योजनेचे कौतुक केले. कोरोना सुरक्षा कवचमुळे रिक्षाचालक आणि प्रवासी यांची सुरक्षा अबाधित राहील आणि कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी अनिल विश्वकर्मा, गुरुदयाळ यादव, मंगेश चौधरी, संदीप मिश्रा, सुरेंद्र यादव व मुन्ना गुप्ता उपस्थित होते.

--------------------------------------